राज्याचा गाळप हंगाम 52 दिवसांनी घटला; साखर उत्पादनावर विपरीत परिणाम | पुढारी

राज्याचा गाळप हंगाम 52 दिवसांनी घटला; साखर उत्पादनावर विपरीत परिणाम

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  देशात गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातच साखरेचे उत्पादन उच्चांकी झाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 32 लाख टनांनी उत्पादन घटले आहे. यंदा उसाचे घटलेले क्षेत्र, बंद असलेले कारखाने सुरू होणे व ऊस तोडणीचा प्रश्न या कारणांमुळे यंदाचा हंगाम लवकर आटोपला आहे. गतवर्षीचा हंगाम 173 दिवस सुरू होता. मात्र, यंदा हाच हंगाम 121 दिवस चालला आहे. यंदा तब्बल 52 दिवस हंगाम कमी झाल्यानेच उत्पादनावर परिणाम झाला आहे.

यंदाचा हंगाम लवकर सुरू होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. 15 ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, मध्येच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हंगाम पुन्हा एकदा लांबणीवर पडला. यंदाचा हंगाम दिवाळीनंतरच सुरू झाला. त्यातच तोडणी अपेक्षित गतीने न झाल्याने कारखान्यावर लवकर उस पोहचलाच नाही. त्यामुळे यंदा गाळप क्षमता वाढली असतानाही गाळप 300 लाख टनांनी कमी झाले आहे. तोडणीसोबत उसाचे क्षेत्र कमी झाल्याचा फटकाही यंदाच्या हंगामाला बसला आहे. शेवटच्या टप्प्यात तर अक्षरश: मजुर शोधण्याची वेळ आली. यामुळे अनेक कारखान्यांनी गाळपाचे जे उद्दिष्ट ठेवले होते तेही पूर्ण झालेले नाही.
राज्यात गत हंगामात 173 दिवस गाळप चालले होते. यामध्ये 1 हजार 321 लाख टन उसाचे गाळप होवून 137 लाख टन 36 क्विंटलचे उत्पादन झाले होते. तर उतारा हा 10.40 टक्के पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वत्रच घट झालेली आहे. राज्यात गाळप व उत्पादनात अव्वल असलेला कोल्हापूर विभाग केवण 124 दिवस चालला आहे. या पाठोपाठ पुणे विभाग 132, सोलापूर विभाग 118, अहमदनगर विभाग 121, औरंगाबाद विभाग 121, नांदेड विभाग 117 दिवस, अमरावती विभाग 96 दिवस आणि नागपूर विभागातील कारखान्यांचा हंगाम 117 दिवस चालला आहे.

असा राहिलाय दशकभरातील हंगाम

गत 10 वर्षांची आकडेवारी पाहता, यंदाचा हंगाम हा दुसरा सर्वात कमी दिवसांचा हंगाम असलेले वर्ष आहे. सन 2013- 14 मध्ये 128 दिवस, 2014-15 मध्ये 132 दिवस, 2015-16 मध्ये 150 दिवस, 2016-17 मध्ये 126 दिवस, 2017-18 मध्ये 72 दिवस, 2018-19 मध्ये 142 दिवस, 2019-20 मध्ये 127, 2020-21 मध्ये140 दिवस, 2021-22 मध्ये 173 दिवस आणि यावर्षी केवळ 121 दिवस हंगाम चालला आहे. वर्षानुवर्षे गाळप क्षमतेतही वाढ झाली असून 6.9 लाख टन प्रतिदिन असलेली गाळप क्षमता सद्य:स्थितीत 9.50 लाख टनांवर गेली आहे. त्यामुळेच उत्पादनात वाढ होत आहे.

Back to top button