'रयत'ची धुरा पुन्हा शरद पवारांकडेच | पुढारी

'रयत'ची धुरा पुन्हा शरद पवारांकडेच

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणार्‍या सातारच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह मॅनेजिंग कौन्सील सदस्य यांच्या मंगळवारी निवडी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची रयतच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. याचबरोबर 5 उपाध्यक्ष, 15सदस्य , 6 लाईफ मेंबर प्रतिनिधी, 3 लाईफ वर्कर प्रतिनिधींची यावेळी निवड करण्यात आली. दरम्यान, संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या दर 3 वर्षांनी निवडी जाहीर केल्या जातात. त्यानुसार विविध पदासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू होती. सोमवार व मंगळवारी संस्था पदाधिकारी निवडीसंदर्भात शासकीय विश्रामगृह व रयत शिक्षण संस्थेत खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. बैठकीत संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर संस्था पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. खा. शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले (वाशी), अरूण कडू पाटील, पी.जे. पाटील (उरण), अ‍ॅड. राम कांडगे(पुणे), महेंद्र लाड (पलूस) यांची निवड करण्यात आली. मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे पाटील, आ.डॉ. विश्वजीत कदम, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, रामशेठ ठाकूर, अ‍ॅड. रविंद्र पवार, मीनाताई जगधने, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित पाटील, राहुल जगताप, जनार्दन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्रा. सदाशिव कदम. धनाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. लाईफ मेंबर प्रतिनिधीपदी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, विनोदकुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांची निवड करण्यात आली. लाईफ वर्कर प्रतिनिधीपदी नवनाथ जगदाळे, प्रा.डॉ. संजय नगरकर, सौ. ज्योत्स्ना ठाकूर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सचिवपदासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष पदाच्या निवडी दि. 27 मे रोजी पुण्यात होणार्‍या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत होणार असल्याची माहिती संस्थेतून देण्यात आली. दरम्यान, आगामी काळात संस्थेच्या सचिवपदी निवृत्त सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा रयत वर्तुळात सुरू आहे.

Back to top button