पाटण; पुढारी वृत्तसेवा: पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पहिल्यांदाच ऐतिहासिक सत्तांतर घडले. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई गटाने १८ पैकी तब्बल १५ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.
पाटण बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये हमाल , तोलारी मतदारसंघातून सत्ताधारी पाटणकर गटाचे आनंदराव पवार हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. रविवारी १७ जागांसाठी मतदान तर सोमवारी मतमोजणी झाली . मतमोजणीमध्ये पहिल्या निकालात व्यापारी मतदारसंघातून सत्ताधारी पाटणकर गटाचे अरविंद पाटील व बाळासो महाजन हे निवडून आले.
त्यानंतर ग्रामपंचायत व सोसायटी अशा एकूण १५ जागांवर देसाई गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून जोतीराम काळे, समीर भोसले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून सुधाकर देसाई, अनुसूचित जाती गटातून सिद्धार्थ गायकवाड,
सोसायटी सर्वसाधारण गटामधून संग्राम मोकाशी, मानसिंग कदम, विलास गोडांबे, राजेंद्र पाटील, सिताराम सूर्यवंशी, बाळकृष्ण पाटील, दादासो जाधव, महिलांमधून वैशाली शिंदे, जयश्री पवार, भटक्या जातींमधून धनाजी गुजर, इतर मागासवर्गीय गटातून नितीन यादव हे उमेदवार निवडून आले.
या निवडणुकीत सत्ताधारी पाटणकर गटाला अनपेक्षितरित्या मोठा राजकीय धक्का बसला आहे . पाटणकर गटाला व्यापारी मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळाले. तर ग्रामपंचायतमध्ये देसाई गटाचे वर्चस्व होते. त्यानुसार तेथे देसाई गटाला अपेक्षित मताधिक्य मिळाले आहे. सोसायटी मतदार संघातील तब्बल ११ जागांसाठी येथे अक्षरश : काटे की टक्कर पहायला मिळाली.
शंभूराज देसाई गटाच्या उमेदवारांना काठावरचे परंतु अनपेक्षित मताधिक्य मिळाले. यात त्यांचे सर्व उमेदवार निवडून आले. आतापर्यंत कायमच या बाजार समितीची सत्ता पाटणकर गटाकडे होती. याहीवेळी ग्रामपंचायत वगळता अन्य मतदारसंघात पाटणकर गटाचे उमेदवार विजयी होतील, अशा अपेक्षा होत्या. मात्र, ऐनवेळी सोसायटी मतदारसंघात अनपेक्षित बदल घडला आणि वर्षानुवर्षे सत्ता प्रस्थापित असलेल्या सत्ताधारी पाटणकर गटाला अनपेक्षितरित्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
हेही वाचा