Udayanraje vs Shivendraraje : ‘नगरपालिकेला लोळवायची वेळ आणू नका’ | पुढारी

Udayanraje vs Shivendraraje : 'नगरपालिकेला लोळवायची वेळ आणू नका'

सातारा : पुढारी वृत्तसेवा : Udayanraje vs Shivendraraje : सातारा नगरपालिकेचे निवडणुकीचे वातावरण तापू लागल्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले (mla shivendraraje bhosale) आणि खासदार उदयनराजे भोसले (MP udayanraje bhosale) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सातारा नगरपालिकेत गेली साडेचार वर्षे झाली कोणतीही कामे झालेली दिसत नाहीत. पालिकेत भ्रष्टाचार बोकळला आहे. सत्ताधारीचे नगरसेवक एकमेकांच्यावर आरोप करत आहेत. सातारा विकास आघाडीने मागील साडेचार वर्षात काय केले हा माझा विचाराचा अधिकार आहे, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. ( Udayanraje vs Shivendraraje )

रविवारी उदयनराजेंचा युवकांबरोबर संवाद आहे. नेमका हा संवाद निवडणुकीच्या आधीच का सुचला? पाच वर्षे नेमकं उदयनराजेंनी काय केलं? 5 वर्ष युवक नव्हते का? असे सवालही शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केले आहेत.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे सातारा हद्दीतील टोलनाके कोण चालवतं हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही खासदार असूनही मग या रस्त्याची अवस्था अशी का? असा टोलाही आमदार शिवेंद्रराजे यांनी लगावला आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची शिवेंद्रराजे यांच्यावर टीका…

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यात दुचाकीवरून जाऊन विकास कामांचे उद्घाटन केले होते. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी टोला लगावत नगरपालिका नीट चालवली असती तर दुचाकी चालवायची वेळ आली नसती, असे म्हंटले होते. यावर उदयनराजे यांनी किल्ले प्रतापगड येथे त्याला भन्नाट प्रत्युत्तर दिले.

उदयनराजे म्हणाले, मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो, मी चालत ही जाईन, रांगत ही जाईन, वाटले तर लोळत ही जाईन नाहीतर लोटांगण घालत ही जाईन. एवढेच काय गडगडत ही जाईल, सीट वर उभा राहून जाईल नाहीतर डोक्यावर चालत जाईन, तुम्हाला काय करायचेय? अशा भाषेत उत्तर दिल्याने राजेंमधील नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button