सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिल्ट्री) हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात असले, तरी ते सैनिकांचेच नव्हे तर लढवय्यांचे गाव असल्याचे ऐतिहासिक पुरावे समोर आले आहेत. पहिल्या महायुद्धात गावातील 178 जण ब्रिटिश सैन्यात होते. अनेक जण सधन कुटुंबातील असतानाही मायभूमीच्या रक्षणासाठी अपशिंगेकर लढवय्या म्हणूनच सैन्यात दाखल झाले.
गावातीलच यशवंतराव निकम यांनी गावच्या सैनिकी परंपरेचा धांडोळा घेतला. सैनिक आणि लढवय्या यामधील फरक जाणून घेत या आनोख्या प्रवासाला यशवंतराव निकम यांनी सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही केवळ अर्थार्जन नव्हे तर शौर्य दाखवणे व पराक्रम गाजवण्यासाठीच अनेक जण सैन्यात दाखल झाले.
आदित्य निकम (पाटील) यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचे मूळ पुरूष सयाजी खळोजी पाटील हे अदिलशाहीचे सरदार होते. मात्र, यावर पुढे संशोधन झालेले नाही. यशवंतराव निकम यांचे वडील स्व. राजाराम निकम हे जर्मनीत 5 वर्षे युद्धकैदी होते. या दरम्यान पहिल्या महायुध्दात गावातील अनेक जण धारातीर्थी पडले होते. अपशिंगेकर हे केवळ सैनिक नव्हे तर लढवय्या असल्याचा शोध घेण्यासाठी अनेक ब्रिटीशकालीन कागदपत्रांचा शोध त्यांनी घेतला. काही घरांमध्ये दिवंगत लढवय्यांची कागदपत्रे उपलब्ध झाली.
आतापर्यंत 1914 पासूनच्या 300 व्यक्तिंची माहिती त्यांनी संकलित केली आहे. कॅ. रामचंद्र निकम यांनी त्यांच्या आजोबांच्या काळातील कागदपत्रे जपून ठेवली आहेत. या दस्तावेजानुसार त्यांच्या आजोबांची नेमणूक ब्रिटिशांनी निवृत्तीनंतर रिक्रूटींग ऑफिसर अशी केल्याचे दिसून येते. कॅ. पिराजी निकम यांच्याकडील उपलब्ध कागदपत्रांनुसार 45 पेन्शनर, 12 फॅमिली पेन्शनर (युद्ध विधवा), 2 रिझर्व्ह 43 डिसचार्ज, 60 सेवेत असलेले, 14 शहीद आणि 2 हयात अशा एकूण 178 लोकांनी पहिल्या महायुध्दात पराक्रम गाजवला आहे. यावेळी 14 जण शहीद झाले होते. त्याकाळी गावातील प्रत्येक घरात 20-25 एकर जमीन होती. केवळ अर्थार्जनासाठी हे सैन्यात दाखल झाले असतील हे संभवत नाही. लढवय्या वृत्ती व शौर्याची परंपरा या बाबी त्याला कारणीभूत आहेत. यामुळेच या गावाने देशसेवेसाठी अख्खी कुटुंबेच्या कुटुंबे देशाला समर्पित केली आहेत.
या ऐतिहासिक दस्तावेजावरून अपशिंगे गावास 'सैनिकांचे गाव' संबोधन्याऐवजी लढवय्यांचे, शूरवीरांचे, योद्ध्यांचे गाव म्हणणे समर्पक ठरेल. केवळ अर्थार्जनासाठी सैनिकी परंपरा जपणारी ही भूमी नाही तर पराक्रम, शौर्य गाजवणार्यांची ही भूमी आहे.
अपशिंगे हे सैनिकांचेच गाव नसून लढवय्यांचे गाव आहे. सैनिक व लढवय्या यातील फरक समजल्यानंतर ऐतिहासिक दस्तावेज काढण्यास सुरुवात केली. यामध्ये मला यश मिळाले असून अगदी अदिलशाहीपासून ते ब्रिटिश सरकारपर्यंतची माहिती मिळाली. यातून अपशिंगे हे लढवय्यांचे गाव असल्याचे स्पष्ट झाले असून याचा मला अभिमान आहे. – यशवंतराव निकम