मी सुट्टीवर नाही, सध्या डबल ड्यूटीवर आहे; मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला | पुढारी

मी सुट्टीवर नाही, सध्या डबल ड्यूटीवर आहे; मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा :  मी सुट्टीवर नाही, सध्या डबल ड्यूटीवर आहे. अडीच वर्षे घरी बसलेल्यांनी दोन-तीन दिवस इकडे-तिकडे गेलो यावर बोलू नये, असा टोला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला. आरोप करणार्‍यांना काहीच कामधंदा नाही, आता त्यांना घरीच बसवलंय. घरी बसवलंय म्हणून आरोप करताय. पण, आम्ही आरोपांचे उत्तर आरोपाने नव्हे तर कामाने देऊ, असा विश्वासही मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेल्याची चर्चा मंगळवारपासून रंगली होती. मुख्यमंत्र्यांच्या या रजेवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. तसेच विरोधकांनी देखील त्यांना घेरले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी महाबळेश्वरमधील राजभवन येथे माध्यमांशी संवाद साधला.

ना. शिंदे म्हणाले, मी सुट्टीवर आलो नसून डबल काम करत आहे. हे आमचं डबल इंजिनचं सरकार आहे. विरोधकांच्या टिकेवर मी कधीच लक्ष दिले नाही. माझे कामावर लक्ष असून काम हेच माझे कर्म आहे. माझा हा दौरा नियोजित होता. आम्हाला सुट्टी वगैरे काहीही नसते. टिका करणं हे विरोधकांचं कामच आहे. त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. अडीच वर्षे घरी बसणार्‍यांनी माझ्या सुट्टीवर बोलू नये.
समृद्धी महामार्गालादेखील सुरुवातीला विरोध केला होता. मात्र, मी खंबीरपणे आणि जिद्दीने हा प्रकल्प पुढे नेला,असेही ना. शिंदे यांनी यावेळी सांगितले. चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याची टिकाही त्यांनी ठाकरेंवर केली. बारसू ही ग्रीन रिफायनरी असून यामुळे प्रदूषण होणार नाही. बारसू येथे रिफायनरी व्हावी, त्या भागाचा विकास व्हावा, लोकांना रोजगार मिळावा, हा उद्देश या पाठीमागे असून हजारो कोटींची गुंतवणूक तिकडे होऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बारसू रिफायनरीला त्यावेळी का विरोध केला नाही?

बारसू ग्रीन रिफायनरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. त्यामुळेच या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला होता. त्यावेळी ठाकरेंनी का विरोध केला नाही? त्यावेळी विशिष्ट परीस्थिती होती का? विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या का? आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर विरोध करण्याचे कारण काय? असे सवालही ना. शिंदे यांनी उपस्थित केले.

 

Back to top button