महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात थंडी | पुढारी

महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात थंडी

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर या पर्यटनस्थळी तापमानाचा पारा सारखा बदलत असून या बदलत्या तापमानाने पर्यटक व स्थानिकही अचंबित होत आहेत. रविवारी पहाटे वेण्णालेक व लिंगमळा परिसरात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पर्यटकांसह स्थानिकांना थंडीचा फिल अनुभवयास मिळाला.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात इतरत्र तापमान वाढत असताना थंडीचा बालेकिल्ला असलेल्या या जागतिक पर्यटनस्थळी मात्र वातावरणात कमालीचा बदलाव जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात कमी अधिक प्रमाणात चढ -उतार होत आहे. सायंकाळी थंड तर सकाळी काहीसा उष्मा जाणवत आहे. महाबळेश्वरमधील वेण्णालेक व लिंगमळा परिसरात रविवारी पहाटे अवघ्या 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हा परिसर गारठून गेला.

शहरातील अन्य भागातही तापमान 12 अंशांपर्यंत घसरले होते. या बदलत्या ऋतूचक्राने पर्यटकांसह स्थानिकही हैराण झाले आहेत. गेले दोन दिवस येथे पर्यटकांची विकेेंडमुळे वाढती गर्दी असून या बदलत्या हवामानाचा पर्यटकही आनंद घेताना दिसत आहेत. शनिवार व रविवारमुळे येथे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.

 

Back to top button