सातारा : शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा : शेतात शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या फासकीत अडकून आबदारवाडी (ता. पाटण) येथे एका मादी बिबट्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. 22 रोजी घडली. या प्रकाराबाबत वन्यप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तारेचा फास लावणार्या अज्ञाताविरोधात वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे.
मल्हारपेठ वनविभागाच्या अधिकार्यांकडून मिळालेलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आबदारवाडी येथील धायटा नावाच्या शिवारात सुमारे चार वर्षे वयाचा मादी बिबट्या खाण्याच्या शोधात डुकराला लावलेल्या तारेच्या फासात अडकला. यात बिबट्याचा कमरेचा भाग अडकल्याने धडपडून त्याचा जागीच मृत्यू झाला. याविषयीची एका नागरिकाने फोनवरून माहिती दिल्यानंतर सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. पोतदार, मल्हारपेठचे वनपाल संजय भाटे व वन कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटनेचा पंचनामा करून पशू वैद्यकीय अधिकारी अतुल पाटणे यांना बोलावून बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी 3 वाजल्यानंतर मल्हारपेठ जंगल क्षेत्रातील एका ठिकाणी बिबट्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर वन कर्मचार्यांनी घटनास्थळासह परिसराची पहाणी केली असता त्यांना बिबट्याची पिल्ले आढळून आली नाहीत. दरम्यान वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तारेचा फास लावणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात वनविभागाने गुन्हा नोंदवला असून संशयिताचा शोध सुरू आहे.

