सातारा : कोयनेतील उल्लोळक विहिरीची होणार दुरुस्ती | पुढारी

सातारा : कोयनेतील उल्लोळक विहिरीची होणार दुरुस्ती

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : मागील वर्षी कोयना जलाशयाला भगदाड पडल्याच्या वृत्ताने राज्यभर भीती निर्माण झाली होती. त्यानंतर हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट झाले आणि यातूनच कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा एक व दोन उल्लोळक विहीर व आपत्कालीन झडप भुयारातील पाणी गळती समोर आली होती. आता याच्या दुरूस्तीसाठी राज्य शासनाकडून निविदा जाहीर झाली आहे. मात्र असे असले तरी सध्या सुरू झालेल्या कार्यवाहीला काहीसा वेळ झाल्याने निदान यावर्षी तरी हे दुरुस्तीचे काम होणे अशक्य असल्याचे स्पष्ट आहे.

कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील वीज निर्मितीसाठी जे पाणी नवजा टॉवरमधून अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेलमार्गे निघते, त्यासाठी बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळक विहीर (सर्जवेल) बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल सन 1960 साली बांधलेली आहे. त्या काळात शंभर मीटर खोल कातळात ती खोदलेली आहे आणि त्या ठिकाणी अर्धा मीटर रुंदीचे काँक्रीट अस्तरीकरण केलेले आहे. या विहिरीने सहा दशकांच्या कालावधीत आजवर शेकडो भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत.

मात्र आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्याने सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी वॉल टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयारात जाते आणि तेथून ते डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत आहे. यामुळे वीजगृह, जलाशय किंवा धरण परिसरातील डोंगराला कोणताही धोका नाही. संबंधित गळतीची दुरुस्ती प्रस्तावित असून आता यासाठी 16 कोटी 12 लाख रुपयांची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दुरुस्तीसाठी टप्पा एक व टप्पा दोन वीज निर्मिती काहीकाळ बंद ठेवावी लागणार आहे. दुरुस्तीसाठी टप्पा एक व दोनमधून त्या काळात वीज निर्मिती बंद राहिली तरी त्यावेळी टप्पा चारमधून आवश्यक ती वीज निर्मिती केली जाणार आहे.

धरणासह वीजनिर्मिती प्रकल्पांना धोका नाही…

ज्या ठिकाणाहून पाण्याची गळती होत आहे, तेथून प्रतिसेकंद तीन घनफुटापेक्षा जास्त पाण्याची गळती होत नाही. संबंधित जागा ही दुर्गम ठिकाणी असून धरणातील पाणीसाठ्याचा विचार करता उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी असताना ही दुरुस्ती करणे शक्य होईल. त्यासाठी महाजनको व जलसंपदा विभाग प्रयत्नशील आहे. या गळतीमुळे धरणासह वीज निर्मिती प्रकल्पांना कोणताही धोका नाही. आता निविदा प्रसिद्ध झाल्याने लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल आणि गळती पूर्णपणे थांबेल, असा विश्वास कोयना धरणाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button