सातारा : सराईत टोळीकडून 64 तोळे सोने जप्त | पुढारी

सातारा : सराईत टोळीकडून 64 तोळे सोने जप्त

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्ह्यात दरोडा, जबरी व घरफोड्या करणार्‍या टोळीचा पोलिस दलाने पर्दाफाश करत, चोरीतील 35 लाख 84 हजार रुपये किमतीचे तब्बल 64 तोळे सोने जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, संशयित सराईत चोरटे आहेत. एसपी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली पोलिसांची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली आहे.

चांद ऊर्फ सूरज जालिंधर पवार (वय 22, रा. काळज), पृथ्वीराज युरोपियन शिंदे (वय 25, रा. ठाकुरकी), चिलम्या ऊर्फ संदीप महावीर ऊर्फ माळव्या शिंदे (वय 22, रा. सुरवडी, सर्व ता. फलटण) अशी संशयितांची नावे असून, आणखी तीन संशयितांचा शोध सुरू आहे. सातारा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याची माहिती दिली.

लोणंद पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत होते. गेली आठ दिवस चांद उर्फ सुरज पवार याचा पोलिस शोध घेत होते. तो काळज गावच्या हद्दीतील बडेखान या ठिकाणासह इतर ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने साथीदारांसोबत दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार करुन इतर संशयितांची धरपकड केली. न्यायालयाने त्यांना 5 दिवस पोलिस कोठडी दिली.

संशयितांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर एक-एका गुन्ह्यांची उकल करण्यास सुरुवात झाल्यानंतर चोरट्यांनी दिलेल्या माहितीने पोलिसही हादरुन गेले. कारण एकामागून एक अशा प्रकारे 21 गुन्ह्यांची कबुली दिली. संशयितांनी दिलेल्या कबुली नंतर खातरजमा करत पोलिसांनी मुद्देमाल जप्त करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या गुन्ह्यातील मुद्देमालापैकी 46 हजार 200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेले हत्यार कोयता हस्तगत केला. त्यानंतर पुढे आणखी 20 गुन्ह्यातील एकूण 64 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, अर्धा किलो चांदीचे दागिने, गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 36 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, विजय जाधव, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस तानाजी माने, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, दिपाली यादव, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, स्वप्नील माने, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, सचिन ससाणे, पंकज बेसके, गणेश कचरे, राजू कुंभार, अजय जाधव, अमित झेंडे, ज्योती शिंदे, महेश पवार यांनी ही कारवाई केली.

सहा महिने… दीड किलो सोने जप्त…

समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार घेऊन सहा महिने झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी रेकॉर्डब्रेक कामगिरींचा सपाटाच लावला आहे. नोव्हेंबर 2022 पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, इतर चोरी असे एकूण 67 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 153 तोळे सोने अर्थात दीड किलो सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हा सर्व मुद्देमाल 1 कोटी 33 लाख 76 हजार 830 एवढ्या किमतीचा आहे.

Back to top button