

सातारा; पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाने सातार्यात येऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. हा अत्याचार सातारा शहरातील कॅफे, हॉटेलमध्ये झाला आहे. याप्रकरणी संकेत मेंगाणे (वय 19, मूळ रा. मेंगाणेवाडी ता. पन्हाळा, सध्या रा. शिक्रापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताने फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना फेब्रुवारी ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत घडली आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. संशयित युवकाची पीडित मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून युवकाने तिला सातार्यातील एका शाळेजवळ भेटायला येत असल्याचे सांगितले.
पहिली भेट झाल्यानंतर संशयित युवकाने त्या भेटीचा व्हिडीओ व फोटो काढला. पुन्हा त्यानंतर संशयिताने सातार्यात भेटायला येवून मुलीला कॅफेमध्ये नेऊन तिचा जबरदस्तीने विनयभंग केला. याबाबतची माहिती कोणाला सांगितल्यास काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने मुलीला दिली. यामुळे मुलगी घाबरली. याचाच गैरफायदा पुढे युवकाने घेतला. मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही संशयित युवकाने तिला सातार्यातील कॅफे, हॉटेल येथे नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या कृत्यामुळे मुलगी घाबरल्याची बाब पालकांच्या लक्षात आली. तिला विश्वासात घेऊन बोलते केले असता तिने कुटुबीयांना घडत असलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पालकांनी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिल्यानंतर युवकाविरुध्द बालकांचा लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.