सातार्‍यातील नेत्याकडूनच मेडिकल कॉलेजचे काम बंद : आ. शिवेंद्रराजे

सातार्‍यातील नेत्याकडूनच मेडिकल कॉलेजचे काम बंद : आ. शिवेंद्रराजे
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा झालाय, असं सांगणार्‍या खासदारांनी त्यावेळच्या चौकशीचे काय झालं, हे सांगावं. सातारा शहरातील नेत्याच्या सांगण्यावरूनच मेडिकल कॉलेजचे काम बंद पाडण्यात आले. खिंडवाडीतील खाणीचा खाणपट्टा मंजूर नसून बेकायदा सुरू असलेल्या या खाणीच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या खाणीवर खासदारांनी बोलावे. 'मी नाय त्यातली अन् कडी लाव आतली', असा काही जणांमध्ये प्रकार आहे, असे टीकास्त्र आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सोडले.

मंगळवारी आ. शिवेंद्रराजे यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा मेडिकल कॉलेजच्या कामाला संरक्षण मिळणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले. त्यामागचा हेतू काय होता, हे कळत नाही. ठेकेदाराची हॅरेशमेंट होऊ नये आणि आर्थिक मागणीचा प्रकार असेल किंवा राजकीय हेतूने आडकाठी आणली जात असेल तर ते चुकीचे आहे. खिंडवाडी येथील खाणीतून बेकायदा उत्खनन सुरू आहे. या खाणीचा खाणपट्टा मंजूर नाही, रॉयल्टी भरलेली नसून याप्रकरणाची चौकशी करावी. जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली, भ्रष्टाचार झालाय का, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, ईडीची नोटीस आली नाही; पण माहिती घेऊन गेले होते. त्याचवेळी हा विषय संपला. खिंडवाडीत सुरू असलेल्या बेकायदा उत्खननाबाबत खासदारांनी बोलावे. बोलायचं भरपूर पण काम करण्याचा प्रकार वेगळा आहे. सातार्‍यातील काही लोकांमध्ये मराठीतील म्हणीप्रमाणे, 'मी नाय त्यातली आणि कडी लाव आतली,' असा प्रकार सुरू आहे. मेडिकल कॉलेजचे काम रखडवू नये याचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा.

बाजार समितीच्या प्रस्तावित इमारतीबाबत विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, खिंडवाडीतील 17 एकर जागेवर सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन आहे. ही जागा परत मिळावी, असा काही लोकांचा प्रयत्न होता. प्लॉट पाडून कोट्यवधी रूपये मिळवण्याचा प्रयत्न होता पण आम्ही त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे काही नेतेमंडळी नाराज होवून बाजूला गेली. निवडणुकीनंतर प्लॅन तयार करणार आहे. जागा परत दिली नाही म्हणून मनोमीलन तुटले का?, हे त्यांनाच विचारायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खा. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, गेली 15 वर्षे खासदार म्हणून कुणाला निवडून दिले, हे लोकांना या निमित्ताने कळेल. गाठीभेटी घेणे, मिठ्या मारण्याची वेळ निघून गेली आहे. पाणी पुलाखालून नाहीतर पूलच पाण्यात गेला आहे. गाठीभेटीचा काहीही परिणाम लोकांवर होणार नाही. केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी सगळीकडे फिरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी माजी जि. प. सदस्य राजू भोसले, फिरोज पठाण, विक्रम पवार, सौरभ शिंदे, विरेंद्र शिंदे आदि उपस्थित होते.

कोर्टाच्या निकालावर विश्वास नाही का?

बाजार समितीबाबत बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, मार्केट कमिटीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दंगा करत त्यांनी त्यांच्या लोकांचे राजीनामे घेतले आणि बाहेर पडले. त्यांनी त्यावेळी मागणी केलेल्या चौकशीचे काय झाले? कोर्टाचा निकाल मनवे यांच्या बाजूने लागला आहे. खा. उदयनराजे मनवेबद्दल बोलत असतील, तर त्यांचा कोर्टाच्या निकालावर विश्वास नाही का? तसे नसेल तर त्यांनी निकाल कसा दिला, याचा जाब कोर्टाला विचारावा. कोर्टाच्या निकालानंतर मनवे यांना कामावर हजर करून घेतले. खासदार कोर्टापेक्षा वर आहेत का? ते म्हणतील तेच खरं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news