महाराणी ताराराणींची समाधी वाळूच्या ढिगार्‍याखाली; ‘पुरातत्व’च्या दुर्लक्षाने अस्तित्व धोक्यात | पुढारी

महाराणी ताराराणींची समाधी वाळूच्या ढिगार्‍याखाली; ‘पुरातत्व’च्या दुर्लक्षाने अस्तित्व धोक्यात

खेड; अजय कदम :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची धाकटी सून महाराणी ताराराणी यांची संगममाहुली येथील समाधी वाळूच्या ढिगार्‍यात लोप पावली आहे. अनेकदा याबाबत आवाज उठवूनही या समाधीच्या जीर्णोध्दारासाठी ठोस प्रयत्न न झाल्याबद्दल इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐतिहासिक पाऊलखुणा काळाच्या पडद्याआड जात असताना पुरातत्व विभाग झोपला आहे का? अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा विवाह 1684 मध्ये तळबीड, ता. कराड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराराणी यांच्याशी झाला. 9 जून 1696 ला त्यांना झालेल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचे निधन झाले. त्यानंतर 7 वर्षे छत्रपती ताराराणी यांनी स्वराज्याची सुत्रे हाती घेऊन औरंगजेबाला कडवी झुंज दिली.

1713 मध्ये कोल्हापूर येथे करवीर छत्रपती गादीची स्थापना केली. 1714 मध्ये सावत्र पुत्र संभाजी महाराजांनी त्यांच्याकडून सत्ता काढून घेतली. त्यानंतर महाराणी ताराराणी यांना येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर रहावे लागले. तेथेच त्यांचे 10 डिसेंबर 1761 ला निधन झाले. संगममाहुली येथील कृष्णा – वेण्णा संगमावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली.

Back to top button