उन्हाळी सुट्टीत मुलांना पोहायला शिकवताना ‘अशी’ घ्या काळजी

उन्हाळी सुट्टीत मुलांना पोहायला शिकवताना ‘अशी’ घ्या काळजी

सातारा : पुढारी वृत्तसेवा : शालेय परीक्षा आता बर्‍यापैकी उरकल्या असून, आजपासून बहुतांश शाळांना उन्हाळी सुट्टी लागत आहे. त्यामुळे खेळणार्‍या, बागडणार्‍या मुलांच्या आनंदावर विरजण पडू नये व उद्याचे भविष्य असलेल्या चिमुरड्यांचे जीव वाचवण्यासाठी आता पालकांनीच मुलांच्या खेळण्याकडे व सुट्टीतील त्यांच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुलांना पोहायला शिकवताना घ्या काळजी

उन्हाळी सुट्टीत नदी, विहिरी, तलाव, बंधारे यावर पोहण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत असते. पोहायला गेलेल्या मुलांवर विशेष लक्ष असायलाच हवे. कोण कोण पोहायला गेले आहे? त्यांच्यासोबत जबाबदार कोणी आहे का? या बाबी गांभिर्याने पहायला हव्या.

अनेकदा पोहण्याच्या नादात कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो. जो तो आनंदाने बेहोश होवून मनमुरादपणे पोहण्याचा आनंद लुटत असतो. काहीवेळा पोहता पोहता मस्तीही केली जाते. या गोंगाटात दुर्घटना होण्याची भीती अधिक असते. लहान मुलांना पोहायला शिकवण्यासाठीही नेले जाते. यावेळी आवश्यक ते सुरक्षा साहित्य सोबत नेले आहे का? शिकवणारी व्यक्ती तरबेज अन जबाबदार आहे का? हेही पहायला हवे. अन्यथा वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होणार नाही, हे ध्यानात घ्यायला हवे. खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटणार्‍या या चिमुरड्यांकडे अनेकदा पालकांचे लक्ष नसते. त्यातून अनेकदा या बालगोपाळांना दुखापतींचा सामना करावा लागतो. इथपर्यंत ठिक, पण एकाद्या दुर्दैवी घटनेत निष्पाप जीव जेव्हा बळी जातो तेव्हा केलेल्या दुर्लक्षाचा पालकांना पश्चाताप होतो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा अनेक घटना गतवर्षी घडल्या आहेत. या घटनांमुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुट्टीत मुलांची कशी घ्याल काळजी….

* मुले खेळताना दुरुन लक्ष ठेवा
* धोकादायक वस्तू, कीटकनाशके मुलांच्या हाती लागतील
अशी ठेवू नका
* नाकातोंडात सहज जातील अशा छोट्या वस्तू मुलांपासून दूर ठेवा
* अडचणीत अन् काट्याकुट्यात खेळू देवू नका
* जबाबदार व्यक्तींसोबतच पोहायला पाठवा
* उष्म्यामुळे साप गारव्याच्या ठिकाणी आसरा घेत असतात हे गृहीत धरुन मुलांच्या खेळण्याच्या जागा ठरवा
* गारव्यासाठी घराबाहेर झोपणार्‍यांची काळजी घ्या

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news