सातारा : जुनी वाहने भंगारात; फौंड्री येणार जोमात | पुढारी

सातारा : जुनी वाहने भंगारात; फौंड्री येणार जोमात

सातारा; विशाल गुजर :  केंद्र आणि राज्य सरकारने स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत 15 वर्षे पूर्ण झालेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 79 हजार 172 जुनी वाहने भंगारात जातील. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला बूस्ट मिळणार आहे. या इंडस्ट्रीजला विविध स्वरूपातील वाहनांच्या सुट्या भागाच्या स्वरूपात कास्टिंग पुरवणार्‍या सातारा जिल्ह्यातील फौंड्री उद्योगातील कामाचा जोम वाढणार आहे.

जुन्या वाहनांच्या वापराने प्रदूषण वाढते. इंधन अधिक खर्च होते. ते टाळण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने अशा जुन्या वाहनांसाठी स्क्रॅप पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षे पूर्ण झालेली शासकीय वाहने भंगारामध्ये काढण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन पोर्टल सुरू केले आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात त्यासाठी 150 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. साधारणतः देशातील 1 कोटी 2 लाख जुनी वाहने भंगारात जाणार असून जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार 172 वाहनांचा समावेश आहे. वाहने भंगारात निघाल्यानंतर तितक्याच नव्या वाहनांची गरज निर्माण होणार आहे. त्याने वाहन निर्मिती करणार्‍या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्या कामाची गती वाढणार आहे. या इंडस्ट्रीजमधील विविध मोठ्या कंपन्यांना लागणार्‍या दुचाकी, चारचाकी, माल वाहतूक ट्रक, प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांच्या विविध सुट्या भागांचा पुरवठा सातार्‍यातील फौंड्री उद्योगातून केला जातो. त्यामुळे वाहन निर्मितीचा वेग वाढल्याने आपोआपच या फौंड्री उद्योगातील कामाची गती वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

फौंड्री उद्योगातून 50 टक्के कास्टिंगचा पुरवठा

ब्लॉक, हेड, पिस्टन, मॅनफोल्ड, वॉटरफोल्ड, लिवर आदी स्वरूपातील कास्ट आणि इतर अशा एकूण सुमारे 50 टक्के कास्टिंगचा पुरवठा फौंड्री उद्योगातून देश-परदेशातील वाहन निर्मिती करणार्‍या कंपन्या, उद्योगांना केला जातो. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारने घेतलेल्या जुनी वाहने भंगारात काढण्याच्या निर्णयाचा उद्योग क्षेत्राला निश्चितपणे फायदा होणार आहे.

Back to top button