सातारा : वाईच्या कचरा डेपोत ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती | पुढारी

सातारा : वाईच्या कचरा डेपोत ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती

वाई; पुढारी वृत्तसेवा :  वाई पालिकेच्या सोनापूर कचरा डेपो येथील मैला प्रक्रिया प्रकल्पालगत वाई नगरपालिका आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन, सेप्ट युनिव्हर्सिटी, अहमदाबाद यांचे संयुक्त विद्यमाने एक एकर जागेमध्ये वनक्षेत्र विकसित करण्यात आले आहे. मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून 1400 झाडे लावण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजन देणार्‍या झाडांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे वाईचा कचरा डेपो परिसर हा ऑक्सिजन पार्कच झाला आहे.

कचरा डेपोमध्ये वनक्षेत्र विकसित करण्यासाठी वाई पालिकेत ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावानुसार 2 एकर जागेत हे वनक्षेत्र विकसित करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र, काही कारणास्तव हे काम होवू शकले नव्हते. आता हे काम मार्गी लागले आहे. हे वनक्षेत्र विकसित करण्यामागे लगतच्या मैला व्यवस्थापन प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी व खताचा पुनर्वापर करणे, एक ऑक्सिजन पार्क विकसित करणे हा हेतू आहे. यासाठी जास्त ऑक्सिजन देणार्‍या वनस्पतींची निवड करण्यात आली. यामध्ये तुळस, निंब, बकुळ, फिकस, पेरू, जांभुळ, फणस, कोनाकार्पस आणि बांबू अशा झाडांची लागवड करण्यात आली आहे.

या झाडांचे संगोपन करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे बचत गटानां आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होणार आहे. सोनापूर कचरा डेपो येथे उभारण्यात आलेल्या मैला प्रक्रिया प्रकल्प, 3044 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्प व वनक्षेत्र यामुळे जल, मृदा व वायू प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होण्यास चांगली मदत होणार आहे.

Back to top button