सातारा : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले | पुढारी

सातारा : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले

महाबळेश्वर: पुढारी वृत्तसेवा : गुड फ्रायडेसह शनिवार व रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या पसंतीचे महाबळेश्वर पर्यटन स्थळी पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. एकीकडे ऐन उन्हाळ्यात पावसाची भुरभुर धुकं, थंडी, ढगाळ वातावरण असे पावसाळी व हिवाळी वातावरण पर्यटकांना अनुभवायास मिळत आहे.

शुक्रवारी सकाळ पासूनच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटनस्थळी पर्यटकांची इनकमिंग सुरु झाली आहे. सलग सुट्ट्या अन महाबळेश्वर हे जणू समीकरणच झाले असून मुंबई, पुणेसह विविध ठिकाणांहून पर्यटक आपल्या कुटुंबियांसह मित्रमैत्रणींसह येथे दाखल होतात. धकाधकीच्या वेळापत्रकातून निवांत वेळ काढून येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. उन्हाळी हंगामात पर्यटकांना अधूनमधून पावसाची बरसात धुकं, थंडी अन् ढगाळ असे वातावरण अनुभवायास मिळत आहे.

महाबळेश्वर पर्यटन स्थळाचा मुख्य आकर्षण वेण्णालेक चौपाटीवर मका कणीस, मका फ्रँकी अशा गरमागरम पदार्थांवर ताव मारण्यासोबतच आलेदार चहा, भेळ, पाणीपुरी तसेच आईसगोला स्ट्रॉबेरी विथ क्रीम सारख्या थंडगार पदार्थांची पर्यटक चव चाखताना दिसत आहेत. हौशी पर्यटक वेण्णा लेकवर घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बालचमूसाठी विविध गेम्सची धूम आहे. येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला लॉडवीक पॉइंट शहरानजीकचा सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सुर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉइंटसह अशा पर्यटनस्थळांवर पर्यटकांना फेरफटका मारण्या सोबतच येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.

महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत देखील सायंकाळी पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी होत असून बाजारपेठेतील प्रसिद्ध आकर्षक अशी लाकडी काठी, विविध आकर्षक वस्तू, प्रसिद्ध चप्पल खरेदीसह चणा चिक्की, फज अशा महाबळेश्वरी पदार्थ खरेदीसाठी पर्यटकांचा कल आहे. बदललेल्या या वातावरणामुळे अनेक पर्यटक स्वेटर, शाल परिधान करून फेरफटका मारताना दिसत आहेत.

हेही वाचा 

Back to top button