सातारा : मेटगुताडमध्ये शंभाला रिसॉर्टला ठोकले सील | पुढारी

सातारा : मेटगुताडमध्ये शंभाला रिसॉर्टला ठोकले सील

महाबळेश्वर/पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता अशी बांधकामे महसूल विभागाच्या रडावर आली आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तहसीलदार सुषमा पाटील यांनी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावरील मेटगुताड येथील शंभाला रिसॉर्टचा पाणी व वीजपुरवठा बंद करून इमारतीला सील ठोकण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

गेली अनेक वर्षे महाबळेश्वर तालुक्यातील विनापरवाना बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बांधकाम पाडण्याच्या कारवाईचा खर्च पाहता केवळ कागदोपत्री आदेश निघत होते. परंतु, प्रत्यक्ष कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे वाढली. याची जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी गंभीर दखल घेत महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तहसीलदार सुषमा पाटील यांनी या कारवाईचा मास्टर प्लॅन तयार केला. त्यानुसार तालुक्यात बेकायदेशीर बांधकाम असणार्‍या 400 मिळकती आहेत.

मेेटगुताड येथे डोंगर उतारवर शंभाला रिसॉर्ट या इमारतीचे अनधिकृत बांधकाम झाले होते. गुरुवारी तहसीलदार सुषमा पाटील, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पारवे यांच्या नेतृत्वाखाली महसूल, महावितरण, ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. प्रथम इमारतीचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर रिसॉर्टमधील खोल्यांना सील ठोकले. स्वागत कक्षाला सील ठोकून कारवाईचा फलक लावण्यात आला आहे.

4 इमारतींना लागणार होते सील…

महाबळेश्वरमधील एकूण 4 इमारतींना गुरुवारी सील ठोकण्यात येणार होते. परंतु, कारवाई पथकामध्ये असणारे कर्मचारी व लागणारा वेळ यामुळे एकाच मिळकतीला सील ठोकण्यात आले. मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पथकातील कर्मचार्‍यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. वाई, खंडाळा व जावली तालुक्यांतील महसूल कर्मचार्‍यांचा पथकात समावेश केला जावा. संभाला रिसॉर्ट सील केल्यानंतर आता कोणत्या मिळकतींवर महसूल विभाग कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

कारवाया मॅनेज होण्यासाठी नाहीत ना?

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्ह्यात मोठमोठ्या कारवायांचे ढोल वाजवले जातात. माध्यमांमध्ये बातम्या पेरल्या जातात. अनधिकृत बांधकामांची, अतिक्रमणांची यादी केली जाते. एक-दोन दिवस कारवाया होतात आणि मग परस्पर सेटलमेंटच्या पेट्या जिकडे-तिकडे पोच होतात. यापूर्वी जिल्ह्यात असे घडले आहे, घडत आहे. अनधिकृत बांधकामांना अभय देणार्‍या महाबळेश्वर महसूल विभागानेही आता ज्यांनी बेकायदेशीर बांधकामे केली त्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ केली आहे. आता कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतरही कुणाच्या मिळकती रडावर आहेत हे सांगितले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणात दै. ‘पुढारी’ची करडी नजर राहणार आहे. खरोखरच बेकायदा बांधकामे पाडणार की, चार-दोनजणांना भीती घालून ‘उकळाउकळी’ होणार याकडे ‘पुढारी’चे जिल्ह्यातून लक्ष असणार आहे.

Back to top button