सातारा : कारगाव अन् पिसाडीला लाभले निसर्ग सौंदर्य | पुढारी

सातारा : कारगाव अन् पिसाडीला लाभले निसर्ग सौंदर्य

सातारा; साई सावंत :  सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि प्राण्यांनी समृद्ध असा भाग. यामधीलच एक असणार्‍या कात्रेवाडी, वाघजाईवाडी, कारगाव, पिसाडी हा दुर्गम भाग ट्रेकर्सना आकर्षित करतो. ट्रेकर्सचे कमी असलेले प्रमाण व या भागात लोकवस्ती विरळ असल्याने येथील निसर्ग सौंदर्य पुढे आलेले नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी सातार्‍यातील अजिंक्यतारा ट्रेकर्स ग्रुपने येथील निसर्ग सौंदर्य कॅमेराबद्ध केले आहे.

ग्रुपच्या सागर जाधव, सागर माने, दीपक देशमख,गणेश जगताप, दादा भोसले, पिंटू गवळी, जयेंद्र खोले यांच्यासह 12 जणांनी हा ट्रेक केला. सातार्‍यापासून कास गाव, तांबी, जुंगटी, कात्रेवाडी गावापासून केदारेश्वर मंदिरापर्यंत वाहनाने प्रवास केला. याच परिसरातील एका स्थानिक व्क्तीला घेऊन या ट्रेकर्स ग्रुपमधील जवानांनी वाघजाईवाडी, कारगाव व पिसाडी या भागात भ्रमंती केली. या भ्रमंतीमध्ये ग्रुपच्या सदस्यांना शेकडो प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, साप आढळून आले.

हा परिसर बफर क्षेत्रात असून ट्रेकर्स आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणार्‍यांसाठी मोठी पर्वणी आहे. या परिसरात लोकवस्ती कमी असल्याने कोणी फारसे फिरकत नाही. दुर्गम भाग असल्याने येथील निसर्गसौंदर्य जगासमोर आले नाही. या परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्याच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Back to top button