

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात 9 बाजार समित्यांसाठी विक्रमी 913 अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच पक्ष व गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, यातूनही काही मतदारसंघामध्ये उमेदवार न मिळाल्याने जिल्ह्यातील चार बाजार समित्यांमध्ये 5 जण बिनविरोध निवडून आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेसचा 1 संचालक निवडून आला आहे.
राज्यातील 257 आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, कोरेगाव, लोणंद, फलटण, कराड, पाटण, मेढा, वडूज या बाजार समित्यांचा निवडणुक कार्यक्रम सुरू आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सातारा बाजार समितीसाठी 61, कराड 80, पाटण 60, कोरेगाव 155, वडूज 177, फलटण 121, लोणंद 100, वाई 38 आणि मेढा बाजार समितीसाठी 121 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील 9 बाजार समित्यांसाठी 162 संचालक निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशी होणार असल्याची चिन्हे आहेत.
सोमवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी अर्ज छानणी होणार आहे. यामध्ये कोणाचे अर्ज बाद होणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यानंतर अर्ज माघारीचा कालावधी सुरू होणार आहे. साधारणत: कोणत्याही निवडणुकीत अर्ज माघारीनंतरच किती जागा बिनविरोध झाल्या हे समजते. मात्र, बाजार समित्यांमध्ये अनेक पक्ष व गटांना उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.
यामध्ये वाई बाजार समितीमध्ये भटके विमुक्त आणि हमाल या मतदारसंघामधून राष्ट्रवादीचाच अर्ज आल्याने या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तसेच पाटणमध्ये हमाल-मापाडी मतदारसंघात पाटणकर गटाचीही एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. तर कराडमध्येही काँग्रेसची एक व फलटणमध्ये राष्ट्रवादीचा एक संचालक बिनविरोध निवडून आले आहे. बिनविरोधमध्ये राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचा एक संचालक आहे.