

साखरवाडी; पुढारी वृत्तसेवा : होळ, ता. फलटण येथील निरा नदी पात्रात लाखो मासे मृत आढळले आहेत. पाण्यावर तरंगणारे हे मासे नागरिकांनी बाहेर काढून ढीगच्या ढीग रचले. मृत झालेल्या सुमारे तीन टन माशांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळेे खवय्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, साखर कारखान्याच्या मळीमुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याचे बोलले जात आहे.
होळ (ता. फलटण) येथून निरा नदी वाहत गेली आहे. या नदी पात्रात ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधार्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या मळीमुळे मागील तीन दिवसांपासून पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले असून पाण्यावर मृत माशांचा खच तरंगत आहे. नदीचे पाणी दूषित झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील काही युवक तीन दिवसांपासून हे मृत मासे पकडून टेम्पोच्या टेम्पो भरून भिगवण या ठिकाणी विक्रीस पाठवत आहेत. रासायनिक पाण्यामुळे मृत्यू झालेले मासे खाल्ल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतकर्यांना शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसुद्धा असह्य झाल्याने शेतकरी संताप व्यक्डत करत आहेत.