सातार्‍यातील सहा नामवंत टॉकीज बंद; प्रेक्षकच उरला नाही | पुढारी

सातार्‍यातील सहा नामवंत टॉकीज बंद; प्रेक्षकच उरला नाही

सातारा; मीना शिंदे :  मनोरंजन क्षेत्राचा आरसा म्हणून एकेकाळी चित्रपटगृहांकडे पाहिले जात असे. टीव्ही, यु ट्यूब, नेटफ्लेक्ससारख्या सोशल माध्यमांमुळे चित्रपटगृहांकडे कलाप्रेमी रसिक प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील बहुतांश चित्रपटगृहे बंद झाली असून सातारा शहरातील सध्या सातपैकी सहा थिएटर्सचा कायमचा पडदा पडला आहे.

एकेकाळी कलाकारांच्या अभिनयाला दर्दी रसिकांचे पाठबळ मिळत असे. चित्रपटगृहांबद्दल आता फक्त आठवणी उरल्याचे वास्तव आहे. पूर्वी चित्रपटगृहांवर व्यवस्थापक, तिकीट विक्रेत्यांपासून डोअर किपरपर्यंत अनेकांचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र, ,एकेक करत चित्रपटगृहे बंद होत गेल्याने गेल्या काही वर्षांमध्ये या सर्वांवरच बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. सातारा शहरातील सात चित्रपटगृहांपैकी सहा चित्रपटगृहे बंद झाली आहेत. राजवाडा परिसरातील राधिका, समर्थ, चित्रा, शिवसागर, मार्केटयार्ड परिसरातील कृष्णा, पोवईनाक्यावरील जयविजय व राजपथावरील राजलक्ष्मी या चित्रपटगृहांनी चित्रपट व अभिनय क्षेत्राचा सुवर्णकाळ पाहिला आहे.

सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत चित्रपटप्रेमींची तुफान गर्दी, हिरोहिरॉईनची झगमगती पोस्टर्स, तिकीट खिडकीवरील हाऊसफुल्लचे बोर्ड म्हणजे त्या चित्रपटगृहाचा अभिमान असे. ब्लॅकव्हाईट ते इस्टमनकलर, फ्युजीकलर, सिनेस्कोप चित्रपट म्हणजे स्वप्न व कल्पनेच्या दुनियेत तरंगत ठेवणारी सिनेमाची दुनिया..अशी सर्व सफर घडवणारी थेएटर्स जवळपास बंदच झाली आहेत. आज चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. चित्रपटगृहात जावून तिकीट काढून चित्रपट पाहणारा वर्ग आता कमी झाला आहे.

ओटीटीचा नवा प्लॅटफॉर्म

प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने हल्ली चित्रपटगृहांची संख्या कमी झाली असली तरी चित्रपट पाहणारा वर्ग कायम आहे. परंतु हा प्रेक्षक वर्ग घरातच बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेत आहे. त्यासाठी ओटीटीचा नवा प्लॅटफार्म उपलब्ध झाला असून सिनेरसिकांसाठी तो सोयीचा ठरत आहे. थिएटरला न जाणारे ओटीटीला पसंती देत आहेत.

Back to top button