

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या यात्रानंतर आता ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम बहरला आहे. या यात्रांवेळी होणार्या बैलगाडी शर्यतीमुळे पुन्हा जत्रेतील अर्थकारणाला गती आली आहे. यामुळे शौकिनांचा उत्साहही दुणावला आहे.
यात्रेत होणार्या शर्यतींमुळे आता यात्रेतील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना गती मिळाली आहे. यात्रेतील शर्यतींच्या अड्ड्यांवर सुमारे लाखो रुपयांची उलाढाल होतेच. आता यावर्षीच्या मोठ्या यात्रा संपल्या असल्या तरी ग्रामीण भागातील अनेक गावांच्या यात्रेवेळी बैलगाडी शर्यतींचे आयोजन होेते. या शर्यतींमुळे बैलगाडी, छकाटा निर्मिती, खिल्लार, म्हैसुरी खोंडांनाही मोठी मागणी असते.
मागील काही वर्षे बैलगाडी शर्यती न झाल्यामुळे यात्रेतील आर्थिक उलाढालीला मोठा ब्रेक लागला होता. काही ठिकाणी यात्रांतील मजाच संपली होती. नंतर कोरोनाचे संकट आल्याने यात आणखी भरच पडली. पण, आता हे संकट गेले आहे. यात्रा जत्रांचा हंगाम आता बहरल्याने बैलगाडी शर्यतीही जोमात सुरू आहेत. शर्यती पाहण्याचा एक वेगळाच आनंद शौकिन घेत आहेत.
वाहतुकीमधून किमान अडीच ते तीन लाख रुपये, शर्यती प्रवेश … मधून एक ते दीड लाख रुपये, हॉटेल व्यवसाय, रसवंती गृहे, आईस्क्रीम पार्लर, चहा, पान टपर्यांची सुमारे 2 तेे 3 लाखांची उलाढाल शर्यतीच्या ठिकाणी होत आहे. अर्थातच यात्रांवेळी आयोजित केल्या जाणार्या शर्यतींमुळे यात्रांमधील आर्थिक उलाढालीला चालना मिळाली आहे.