सातारा : जिल्ह्यातील 73 शाळांचा होणार कायापालट | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 73 शाळांचा होणार कायापालट

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया अर्थात पीएमश्री योजनेतून जिल्हा परिषदेच्या शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण व भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील 73 शाळांचा पीएमश्री योजनेमधून कायापालट होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 22 शाळा घेण्यात आल्या आहेत.
पीएमश्री योजना सप्टेंबर 2022 पासून कार्यान्वीत झाली आहे. या योजनेद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करणे, खासगी शाळांशी स्पर्धा करताना विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पायाभूत व भौतिक सुविधा देणे, योग्य संसाधने देणे, आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, यासाठी भरीव तरतूद केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेत पुढे आहेत. मात्र भौतिक सुविधांची कमतरता असल्याने पालकांचा खासगी शाळांकडे कल असल्याचे निदर्शनास आले. शासनाने याचा गांभीर्याने विचार करताना या योजनेतून शाळांमध्ये भौतिक सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के निधी वापरला जाणार आहे. संबंधित शाळांमध्ये गुणवत्तावाढीसह भौतिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, सांस्कृतिक कक्ष, स्वच्छतागृह, स्विमिंग टँक आदींची उभारणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पीएमश्रीतून 37 शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून जिल्ह्यातील शाळांची मॉडेल स्कूल बनवण्यासाठी निवड करण्यात आली होती.

अशी होणार शाळांची निवड

शाळेची पटसंख्या जास्त असावी. शाळेची स्वत:ची पक्की इमारत व मोकळी जागा असावी. मुलामुलींसाठी हात धुण्याची सोय असावी. क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध असाव्यात. शिक्षकांनी निष्ठा प्रशिक्षण पूर्ण केलेले पाहिजे.आरटीईनुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण असावे. शाळा व्यवस्थापन समिती गठीत असावी आदी निकष पूर्ण करणार्‍या शाळांची पीएमश्रीसाठी निवड केली जाते.

या शाळा होणार आदर्श

कोरेगाव तालुक्यातील जि.प. शाळा चिमणगाव, पिंपोडे बु., फलटण तालुक्यातील बरड, निरगुडी. खंडाळा तालुक्यातील लोणंद मुले 2, अहिरे. जावली तालुक्यातील सोनगाव, सायगाव. कराड तालुक्यातील कोळे (मुले), कासार शिरंबे. वाई तालुक्यातील ओझर्डे, खानापूर. पाटण तालुक्यातील विहे नं1, पाटण (मुले). खटाव तालुक्यातील दरूज, अंबवडे. सातारा तालुक्यातील देगाव, नागठाणे. माण तालुक्यातील जांभुळणी, पळशी. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी नगरपालिका शाळा क्रमांक 2, जि.प. शाळा गोडवली या शाळांची निवड पीएमश्री स्कूलसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे.

Back to top button