महाबळेश्वर तालुक्यातील अवैध बांधकामांवर कारवाई; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश | पुढारी

महाबळेश्वर तालुक्यातील अवैध बांधकामांवर कारवाई; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

पाचगणी : पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्यात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई करण्याचे तसेच या बांधकामांची वीज व पाणी पुरवठाही तत्काळ बंद करून मिळकती सील करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अवैध बांधकाम करणार्‍यांचे आता धाबे दणाणले आहेत.

महाबळेश्वरच्या पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने 2001 मध्ये संपूर्ण महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या द़ृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करून बांधकामाबाबत अनेक निर्बंध घातले आहेत. असे असताना देखिल सर्व नियम धाब्यावर बसवून ठिकठिकाणी धनदांडग्यांनी मोठया प्रमाणावर शेत जमिनी खरेदी करत तेथे बेकायदेशीर विनापरवाना बांधकामे केली आहेत. याबाबत अनेकदा तक्रारीही झाल्या आहेत. त्यामुळे पाचगणी, भिलारसह महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामे वाढल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. बेकायदा बांधकाम व उत्खननाबाबत दै. ‘पुढारी’ने वारंवार आवाज उठवला होता. दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

बेकायदा बांधकामांचा सर्व्हे यापूर्वी झाला आहे. अनेक बांधकामांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अशा सर्व बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. कार्यकारी अभियंता महावितरण सातारा, उपविभागीय पोलिस अधिकारी वाई, महाबळेश्वर तहसीलदार , महाबळेश्वर व पाचगणी गिरीस्थान नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व उप अभियंता, जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी या सर्व विभागांना बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अवैध बांधकामांचे पाणी व वीज कनेक्शन तसेच बेकायदेशीर बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत झालेल्या सर्व अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्याबाबतही आदेशात म्हटले आहे. अशी बांधकामे सील करा तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये अनाधिकृत बांधकाम केल्याच्या ठिकाणचे पाणी कनेक्शन संबंधित गावचे ग्रामसेवक यांच्यामार्फत तात्काळ बंद करण्यात यावे. महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये अनाधिकृत बांधकाम केलेल्या ठिकाणचे पाणी कनेक्शनही तात्काळ बंद व सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरच्या तहसीलदार सपना चौधरी यांच्यासह महाबळेश्वर व पाचगणीच्या सर्व प्रशासकीय कार्यालयांना हे आदेश दिले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात महाबळेश्वरच्या तहसिलदार सपना चौधरी यांना विचारले असता कारवाई करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला असून तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, तालुक्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असून भिलार, भोसे, पाचगणी, गुताड, क्षेत्र महाबळेश्वर, पांगरी, कासवंड, खिंगर, राजपुरी तसेच तालुक्यातील सर्वच झोन क्षेत्रात मोठी बांधकामे उभारली गेली आहेत. पैकी अनाधिकृत बांधकामावर थेट कारवाई करावी, असे आदेश दिल्यामुळे अवैध बांधकामांना आळा बसणार आहे.

Back to top button