माझ्याजवळची ती पुडी ‘मसाला इलायची’ची; शंभूराज देसाईंनी तंबाखू खात नसल्याची दिली माहिती | पुढारी

माझ्याजवळची ती पुडी 'मसाला इलायची'ची; शंभूराज देसाईंनी तंबाखू खात नसल्याची दिली माहिती

कराड : पुढारी वृत्तसेवा : अर्थसंकल्पीय अधिवेशनात काहींना काही अशा घटना घडतात की त्यामुळे काही नेते चर्चेत येतात. यावर्षी अधिवेशनात राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई एका व्हायरल व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा सभागृहात बोलत असताना मंत्री देसाई यांनी मागच्या बाकावरील आ. भरत गोगावलेंना खिशातून काढून एक पुडी दिली. भरत गोगावलेंनी ती ‘पुडी’ घेतली, हे दृश्य कॅमेरात कैद झाले. या व्हिडीओवर मंत्री देसाई स्पष्टीकरण दिले.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, मी तंबाखू खात नाही, ना भरतशेठ खातात. माझाकडे मसाला इलायची होती. जी मी घसा कोरडा होतो, म्हणून खातो. ती भरतशेठ यांनी मागितली आणि मी दिली. सभागृहाचे नियमही मला माहिती आहेत. विधानसभा सभागृहात मी १५ वर्ष काम करत आहे. मी काहीही चूक केलेली नाही, असे मंत्री देसाई यांनी सांगितले आहे.

नेमका काय घडला प्रकार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण माहिती सभागृहाला देत होते. यावेळी मागच्या बाकावर बसलेले मंत्री शंभूराज देसाई यांनी खिशातील पुडी काढत पाठीमागे बसलेल्या आमदार भरत गोगावले यांना दिली. या पुडीतील ‘खाद्य’ भरत गोगावले यांनी तोंडात टाकले. त्यानंतर पुन्हा एकदा ही पुडी शंभूराज देसाई यांना त्यांनी परत केली होती. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर गैरसमज टाळण्यासाठी मंत्री देसाई यांनी स्पष्टीकरण दिले.

Back to top button