सातारा : पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघे ठार | पुढारी

सातारा : पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघे ठार

भुईंज; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय महामार्गावरील वेळे गावातून गुळुंब गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. वेळे गावच्या स्मशानभूमीलगत असलेल्या ओढ्यावरील पुलाचे नवीन काम सुरू आहे. या कामासाठी लावलेल्या पत्र्यावर दुचाकी धडकून ही दुर्घटना घडली. प्रमोद गंगाराम यादव (वय 20, रा. यशवंतनगर वाई) व प्रथमेश संतोष खैरे (वय 21, रा. ब्राम्हणशाही वाई) अशी मृत युवकांची नावे आहेत.

याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद व प्रथमेश हे दुचाकीवरून बुधवारी रात्री 8च्या दरम्यान गुळुंबकडे निघाले होते. वेळे येथील स्मशानभूमीजवळील पुलाजवळ ते आले होते. याठिकाणी पुलाचे काम सुरू होते. त्यासाठी पुलाच्या बांधकामाला पत्रे लावण्यात आले होते. हे पत्रे त्यांना रात्रीच्या अंधारात दिसले नाहीत. त्यामुळे या पत्र्याला दुचाकी धडकून दोघेही समोरच्या भिंतीवर आदळले व नजिकच्या ओढ्यात जावून पडले. त्यामुळे दोघांनाही गंभीर इजा झाली होती. दुर्घटनेच्या आवाजाने स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने जखमी प्रमोद व प्रथमेश यांना पाण्यातून बाहेर काढले व कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. याचदरम्यान पेट्रोलिंगवर असणारे सपोनि रमेश गर्जे व पीएसआय रत्नदीप भंडारे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचार होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र उपचारापुर्वीच दोघेही मृत झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी वेळे ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button