सातारा: माजी नगरसेविकेसह कुटुंबावर तलवार हल्ला; माजी नगरसेवकासह १८ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

सातारा: माजी नगरसेविकेसह कुटुंबावर तलवार हल्ला; माजी नगरसेवकासह १८ जणांवर गुन्हा दाखल

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर शहरातील मुख्य चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास क्रांती दिनानिमित्त हार घालण्यावरून किरकोळ वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. ही घटना मेटतळे परिसरात जंगली हॉलिडे होम समोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी (दि. २०) सायंकाळी घडली. या हाणामारीत रोकडे कुटुंबातील चौघांसह योगेश शिंदे हे जखमी झाले.
या हाणामारीत माजी नगरसेविका श्रद्द्धा रोकडे यांच्या सासू मीरा रमेश रोकडे (वय ५५), दीपक मोहन भट (वय ४३) हे गंभीर जखमी झाले. तर पती उमेश रोकडे (वय ३८) सासरे रमेश रोकडे (वय ५८) यांना देखील मारहाण करण्यात आली. फिर्यादी उमेश रमेश रोकडे यांनी महाबळेशवर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश शिंदे, माजी नगरसेवक कुमार शिंदे, बबलू पार्टे, संजय शिंदे यांच्यासह अनोळखी १४ अशा एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश रोकडे यांच्यासह त्यांचे मित्र क्रांतिदिनानिमित्त महाबळेश्वर शहरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालण्यासाठी गेले होते. तेथे उपस्थित असलेले कुमार शिंदे, योगेश शिंदे यांना ते आवडले नाही. त्यानंतर माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे यांचे कुटुंबीय एका वाहनात, तर दीपक भट व रमेश रोकडे हे दुचाकीवरून महाड येथील चवदार तळे येथे अभिवादन करण्यासाठी गेले. तेथे रोकडे कुटुंबीय व योगेश शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांमध्ये वाद झाला. उमेश रोकडे याला योगेश शिंदे याने ”तू वरती भेट तुला दाखवतो” अशी धमकी दिली. चवदार तळे येथील कार्यक्रम संपवून सगळे सायंकाळी महाबळेश्वर कडे निघाले. वाहनामध्ये श्रद्धा रोकडे, उमेश रोकडे यांच्यासह रोकडे कुटुंबियातील सदस्य तर मागे दुचाकीवर उमेश रोकडे यांचे मामा दीपक भट व वडील रमेश रोकडे येत होते. यावेळी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मेटतळे परिसरात जंगली हॉलिडे होम समोरील मुख्य रस्यावर योगेश शिंदे याने रोकडे यांचे वाहन रोखले.

दुचाकीवर असलेल्या दीपक भट व रमेश रोकडे यांना योगेश शिंदे, बबलू पार्टे व इतर अनोळखी लोकांनी हॉकी स्टिक घेऊन बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश रोकडे व त्यांच्या आई मिरा रोकडे यांना देखील मारहाण करण्यात आली. कुमार शिंदे याने तलवारीने उमेश रोकडे याचे मामा दीपक भट यांच्या पोटावर, मांडीवर तर आई मीरा रोकडे यांच्या तोंडावर वार करून जखमी केले. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले.

मीरा रमेश रोकडे, दीपक भट यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर उमेश रोकडे, रमेश रोकडे यांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. या मारामारीत योगेश शिंदे हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत

हेही वाचा 

Back to top button