सातारा : ‘अवकाळी’चा 483 हेक्टर शेतीला तडाखा | पुढारी

सातारा : ‘अवकाळी’चा 483 हेक्टर शेतीला तडाखा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील सुमारे 483.85 हेक्टरवरील शेती पिकांना जबर तडाखा दिला. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, कांदा या खरीप पिकांसह स्ट्राबेरी, आले, भाजीपाल्याचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले असून कृषी विभागाने प्राथमिक नजरअंदाज अहवाल सादर केला आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम मध्यावर आला असून शेतामध्ये गहू, ज्वारी व इतर खरीप पिकांच्या काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. गेली आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. पाऊस पडण्याच्या भीतीने धास्तावलेल्या शेतकरीवर्गाकडून सुगी घरापर्यंत आणण्याची धांदल सुरू आहे. दि. 20 मार्चपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने तडाखे दिले. कोरेगाव, खंडाळ्यासह काही तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे काढून पडलेल्या ज्वारीच्या कणसांत माती शिरली. काही ठिकाणी पावसाने भिजलेली ज्वारी काळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती गव्हाच्या लोंब्यांमध्ये पाणी शिरल्याने झाली आहे. भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकर्‍यांची दाणादाण उडवली.

वाई तालुक्यातील सर्वाधिक 80 गावांना अवकाळीने झोडपले. या गावांतील सुमारे 470.75 हेक्टर शेतीतील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, स्ट्रॉबेरी, भाजीपाला या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. माण तालुक्यात एका गावात झालेल्या अवकाळी पावसाने भाजपाल्यासह ज्वारी आणि गव्हाचे नुकसान झाले. खटाव तालुक्यातील 2 गावांतील 10.70 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, आले व भाजीपाल्याची नासधूस झाली. जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शेती पंचनाम्यांचे काम सुरु केले असून प्रथमिक नजरअंदाज अहवाल सादर केला आहे. पंचनाम्याचे काम सुरू आहे. ज्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे राहिले असतील त्या शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Back to top button