नकट्या रावळ्याची विहीर स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना

नकट्या रावळ्याची विहीर स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा :  12 व्या शतकात शिलाहार राजवटीत नकट्या रावळ्याची ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली होती. कराड शहराच्या वायव्येस एका टेकडीवर प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. ही विहीर नकट्या रावळ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. स्थापत्य कलेचा एक अद्भूत नमुना म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे. कराडच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी ही विहीर असून या विहिरीची जपणूक स्थानिक नागरिक तसेच पुरातत्त्व विभागाकडून केली जाते. ही विहीर कराडचे ऐतिहासिक वैभव आहे. पर्यटक कराडला भेट देताना या विहिरीचा अभ्यास करण्यासाठी येत असतात.

विहिरीचा इतिहास उत्सुकता निर्माण करणारा असल्याने याठिकाणी पुरातत्त्वचा अभ्यास करणारे विद्यार्थी आवर्जून भेट देतात. भुईकोट किल्ल्यात अप्रतिम अशी पाय विहीर आहे. तिला नकट्या रावळाची विहीर असे म्हणतात. 12 व्या शतकातील 'शिलाहार राजवटीत बांधलेली ही विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला, कोयनेच्या पात्रापासून सुमारे पंच्याहत्तर फूट उंचीवर आहे. विहिरीची लांबी 120 बाय 90 फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी पार्‍यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. मुख्य विहीर अकराशे अकरा चौरस मीटरची आहे. तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो. एकूण 82 पायर्‍या असून प्रत्येक वीस पायर्‍या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते. पायर्‍यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते. विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चिर्‍यांचे आहे. ते चुन्यातून घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा दिसतात. विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडले जात असावे. त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणीपुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत, अशी नोंद गॅझेटियरमध्ये पहावयास मिळते.

चावडी चौक परिसरातील मनोरे, सोमवार पेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नकट्या रावळाची विहिरीमुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. आज बुरूज या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत. 84 चौरस मीटर क्षेत्रावर कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगम परिसरातील हा किल्ला थोरल्या शाहू महाराजांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला.

आज किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष भग्नावस्थेत असल्याचे पहावयास मिळते, तर किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजे मराठाकालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण होते. वाड्याच्या दक्षिणेस 259 मीटर लांब – रूंद व 4 मीटर उंच असा दरबार हॉल होता. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानीदेवीची छत्री. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे.

पुरातत्त्व विभागाकडून जपणूक

राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारच्या वर्गवारी असून त्यातील सातव्या वर्गवारीत या विहिरीचा समावेश असल्याचे सांगितले जाते. या विहिरीची देखभाल तसेच डागडुजी करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनीही केला होता. मात्र, त्यांना मर्यादा होत्या. असे असतानाच 2005 नंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने उपाययोजना करत या परिसरात काही निर्बंध घातले आहेत. मात्र, तत्पूर्वीच काही बांधकामे या परिसरात झाली आहेत. विहिरीची बरीच पडझड झाली होती. त्यामुळे तिची दुरुस्ती करण्यात येणे आवश्यक असल्याचे इतिहास प्रेमीकडून सांगितले जात होते. ही विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर मात्र या 'नकट्या रावळाच्या विहिरी'चे भाग्यच उजळले आहे. अनेक अडचणींनंतर आता विहिरीचे डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर सभोवताली भिंती घालण्यात आल्या असून, प्रवेशद्वाराला ग्रील व लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news