

तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा : कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरविना शवविच्छेदन होत असल्याचा प्रकार बुधवारी कराड शिवसेना पदाधिकार्यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून रुग्णालयातील या गैरसोयीबाबत शिवसेनेने वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
येथील स्व.सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांना व नातेवाईकांना पिण्याचे पाणी न मिळणे, अस्वच्छता, वॉर्डामध्ये रुग्णाची हेळसांड, स्वच्छतागृह नादुरुस्त,गरोदर मातांना गरम पाणी न मिळणे, शवविच्छेदन कक्षात डॉक्टरविना सफाई कर्मचार्याकडून करण्यात येणारे शवविच्छेदन या सर्व तक्रारींची दखल शिवसेना पदाधिकार्यांनी घेत बुधवारी अचानक सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली. रुग्णांच्या गैरसोयीबाबत व शवविच्छेदन कक्षात डॉक्टरविना सफाई कर्मचारी शवविच्छेदन करीत असल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला. वैद्यकीय अधीक्षकांनी याबाबत उडवाउडवीचे उत्तरे दिली.
उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत यापूर्वीही निवेदने दिली आहेत. परंतु यामध्ये कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचारीही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेती, असे शिवसेनेचे कराड तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी यावेळी सांगितले. महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुलोचना पवार यांनी रुग्णालयात रुग्णांची व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून सुधारणा न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा दिला. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, संकल्प मुळे, संदीप थोरवडे, अवधूत थोरवडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांशिवाय शवविच्छेदन कधीही झालेले नाही. नेहमी डॉक्टर शवविच्छेदन करतात. सफाई कर्मचार्याने शवविच्छेन करणे ही बाब चुकीची आहे.
– आर.जी. शेडगे वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय, कराड.