कामगार नोंदणी आता केवळ 1 रुपयांत होणार | पुढारी

कामगार नोंदणी आता केवळ 1 रुपयांत होणार

सातारा; विशाल गुजर :  बांधकाम कामगारांना आता मासिक एक रुपया शुल्क भरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करता येणार आहे. अशा नोंदणीकृत कामगारांना घरकुल, गृहकर्जासह शासनाच्या विविध 32 योजनांचा लाभही घेता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील 18 हजार 437 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यातील 9 हजार 145 जणांना योजनांचा लाभ मिळाला आहे.

घरकुलासह विविध योजनांचा लाभ

विविध क्षेत्रातील अकुशल, कुशल कामगारांसाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारचे लाभही दिले जातात. त्यांना कामगार आयुक्त कार्यालयातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी लागणार आहे. पूर्वी या नोंदणीसाठी 25 रुपये शुल्क भरावे लागत होते. आता नवीन धोरणानुसार मासिक केवळ एक रुपया भरून नोंदणी करता येणार आहे. अशा कामगारांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरच नाही तर इतर महत्त्वाच्या योजनांचा देखील लाभ मिळणार आहे.

नोंदणी कशी करावी…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते. मोबाईलवर देखील ही नोंदणी करता येते.

ही कागदपत्रे आवश्यक…

नोंदणीसाठी वयाचा पुरावा, दहा दिवस काम केल्याचा पुरावा, रहिवाशी दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, तीन पासपोर्ट फोटो अशी कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत.

गृहकर्जासह विविध योजना…

नोंदणीकृत कामगारांना शासनाच्या विविध 32 योजनांचा लाभ घेता येतो. ज्यामध्ये घरकुल तसेच विविध कल्याणकारी योजना, शासनाच्या शैक्षणिक योजना तसेच आरोग्य, आर्थिक मदतीच्या योजनेसह गृहकर्जाचाही समावेश आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. आता एक रुपया मासिक शुल्क भरून बांधकाम कामगारांना नोंदणी करता येणार आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी करावी.
-रेवणनाथ भिसले, सहायक कामगार आयुक्त

Back to top button