सातारा : पाणी चोरीविरोधात खटाव तालुक्यात कडकडीत बंद | पुढारी

सातारा : पाणी चोरीविरोधात खटाव तालुक्यात कडकडीत बंद

खटाव, पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव – खटावचे आमदार महेश शिंदे यांनी केंद्र आणि राज्यस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे जिहे-कठापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्यातील नेर धरणात आले आहे. आमच्या हक्काचे आलेले पाणी पळवण्याचा घाट काही उपर्‍या अपप्रवृतींनी घातला आहे. मात्र आमच्या सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. वर्धनगड घाटाखाली सुरू असलेली आमच्या पाण्याची चोरी त्वरित थांबवावी, अन्यथा हातात दांडकी घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खटाव तालुका जिहे-कठापूर पाणी बचाव समितीच्या पदाधिकारी व शेतकर्‍यांनी दिला.

गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे खटाव-माणचे हक्काचे पाणी बेकायदेशीरपणे पळवणार्‍यांचा व त्यांना पाठीशी घालणार्‍यांचा पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खटाव तालुका जिहे-कठापूर पाणी बचाव समिती व लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी जाहीर निषेध केला. यावेळी लाभक्षेत्रातील पुसेगाव, खटाव, बुध, डिस्कळ, विसापूर, जाखणगावसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाजारपेठांत उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.

खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी नेर धरणात पडण्याआधीच रामोशीवाडी (ता. कोरेगाव) येथील नागरिकांकडून एअर वॉल्व्हच्या माध्यमातून चोरले जात आहे. संबंधीत विभागाने खटावच्या दुष्काळी भागाच्या आरक्षित पाणी चोरीला आळा घालण्यासाठी हा एअर वॉल्व्ह कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनकर्त्यांची मागणी विभागीय कार्यालकडे त्वरित कळवण्यात येईल. काम अपूर्ण असलेल्या जिहे-कठापूर योजनेची चाचणी सुरु आहे. या काळात मिळणारे सर्व पाणी नेर धरणात सोडण्यात येईल. वॉल्व्ह बंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेची मदत घेतली जाईल असे उपअभियंता मयुर महाजन यांनी निवेदन स्वीकारल्यावर सांगितले.

दरम्यान, आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे , पाणी गळती थांबलीच पाहिजे अशा घोषणा देत शेकडो शेतकर्‍यांनी परिसर दणाणून सोडला. अनेकांनी मनोगत व्यक्त करताना आ. शशिकांत शिंदे यांचे नाव घेऊन तेच पाणी चोरीला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

Back to top button