सातारा : तळमावले येथे वडिलांनीच चिरला अल्पवयीन मुलीच्या अर्भकाचा गळा | पुढारी

सातारा : तळमावले येथे वडिलांनीच चिरला अल्पवयीन मुलीच्या अर्भकाचा गळा

ढेबेवाडी; पुढारी वृत्तसेवा :  अल्पवयीन मुलीने अर्भकाला जन्म दिल्यानंतर ते रडल्याचा आवाज शेजारील लोकांना ऐकू जाईल व आपली बदनामी होईल या भीतीने संबंधित मुलीच्या वडिलांनी अर्भकाचा गळा चिरल्याचा मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. गळा चिरल्यानंतर पुनर्वसित घोटील (ता. पाटण) गावच्या परिसरात डोंगराकडेला नाल्यात अर्भकाचे शिर व धड टाकून देण्यात आले होते. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी संबंधित मुलीच्या वडिलांना गजाआड केले आहे.

याबाबत ढेबेवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळमावले विभागातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी 34 आठवड्यांची गरोदर असल्याची माहिती तळमावले परिसरातील एका हॉस्पिटलमधून पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करून घेत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित मुलीची पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि यावेळी त्या मुलीच्या पोटात गर्भच नसल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांनी सहकार्‍यांसह या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित पीडित मुलीस विश्वासात घेत तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी घरीच प्रसूती केली. त्यानंतर जन्माला आलेले अर्भक रडत असल्याने शेजार्‍यांना याबाबत काही समजायला नको म्हणून त्याचे तोंड दाबून शस्त्राने त्या अर्भकाचा गळा चिरून वडिलांनीच शीर धडावेगळे केल्याचे संबंधित मुलीने सांगितले. तसेच शीर व धड त्यांनी कोठेतरी टाकून दिले असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी संशयित वडिलांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी अर्भकाचे धड व शीर पुनर्वसित घोटील गावठाण परिसरात असणार्‍या डोंगरालगतच्या एका नाल्यात टाकून दिल्याचे सांगितले. तसेच हा प्रकार समोर येऊ नये, म्हणून नाल्यात पालापाचोळा टाकण्यात आला होता. या माहितीवरून पोलिसांनी शोध घेतला असता घटनास्थळावर शीर व धड मिळून आले. त्यानंतर याप्रकरणी संबंधित मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी सहकार्‍यांसह ही कारवाई केली आहे.

Back to top button