सातारा : कराडमधील राजकीय घडामोडी बदलणार | पुढारी

सातारा : कराडमधील राजकीय घडामोडी बदलणार

कराड : प्रतिभा राजे : पदाधिकार्‍यांच्या निवडी करताना विचारात घेतले जात नाही, कोणाचे तरी ऐकून पदाधिकारी निवडी केल्या जातात. तसेच भविष्यात बाबा गटाची जनशक्ती आघाडीशी पुन्हा हातमिळवणी होवू शकते, अशा अनेक बाबींमुळे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण गटाच्या काही दिग्गज पदाधिकार्‍यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे गेल्या काही घडामोडीतून स्पष्ट होत आहे.

असे असतानाच शुक्रवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कराड दौर्‍यात माजी नगरसेवक इंद्रजित गुजर, कराड शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र माने यांच्या भेटीमुळे कराडमधील राजकीय घडामोडी बदलत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची शहरात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, आ. चव्हाण गटाच्या माजी पदाधिकार्‍यांसह नगरपालिकेसाठीच्या इच्छुकांचाही ठाकरे गटाशी संपर्क असल्याची चर्चा आहे. नगरपालिकांच्या निवडणुका काही महिन्यांनी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाबा गटासाठी हा मोठा धक्का असून आ. चव्हाण या पदाधिकार्‍यांची समजूत घालतात की, याकडे दुर्लक्ष करतात याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वषार्ंपासून काँग्रेस पक्षाशी बाबांशी एकनिष्ठपणे काम करूनही काही पदाधिकार्‍यांना बाबांकडून डावलले गेले असल्याच्या भावना काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा शहरामध्ये आहे. तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेस शहराध्यक्ष पदाची निवड झाली. या निवडीवेळी पदाधिकार्‍यांनाही विचारात न घेता परस्पर निवडी केल्या गेल्या. याबाबतही अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे ‘त्या’ पदाधिकार्‍यांकडून बोलले जात होते. तसेच आपला वेगळा गट निर्माण करण्याचा व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात असून शिवसेनेकडून या पदाधिकार्‍यांना ‘ऑफर’ असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. त्यातच शुक्रवारी शिवगर्जना अभियानाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असणार्‍या खा. संजय राऊत यांनी कराड येथे इंद्रजित गुजर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजेंद्र माने यांच्यासह आ. पृथ्वीराज चव्हाण गटातील नगरपालिकेसाठीच्या इच्छूकांची उपस्थिती नागरिकांच्या भुवया उंचावत होती.

एकीकडे जनपरिवर्तनच्या माध्यमातून आ. चव्हाण गटाकडून‘ जनपरिवर्तन आघाडी’ रजिस्टर करण्यात येत असताना गत महिन्यात पाणी प्रश्नाबाबतही इंद्रजित गुजर, राजेंद्र माने, माजी नगरसेवक फारूक पटवेकर, संजय शिंदे, अमित जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांना स्वतंत्रपणे निवेदन देत आपला सवता सुभा जाहीर केला होता. त्यावेळी या पदाधिकार्‍यांची नाराजी तीव्रपणे दिसून आली होती. त्यानंतर बाबा गटाचे हे पदाधिकारी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिला होता. ठाकरे गटात समाविष्ट होणार्‍या बाबा गटाच्या या पदाधिकार्‍यांना संपर्कप्रमुख किंवा अन्य पदे मिळण्याच्या ‘ऑफर’ असल्याचीही चर्चा आहेत.

मुंबईला चर्चेसाठी निमंत्रण

गेल्या महिन्यातील काही घडामोडीबाबत व खा. संजय राऊत यांच्या भेटीबाबत इंद्रजित गुजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खा. राऊत यांनी आठ दिवसांनी मुंबईला चर्चेसाठी बोलावले असून उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार असल्याचे सांगितले. तसेच पुढील ऑफर काय असेल ? यावर योग्य वाटले तर पक्षप्रवेश ठरणार असल्याचे सांगितले. दरम्यान, बाबा गटाच्या काही पदाधिकार्‍यांनी इंद्रजित गुजर यांच्याशी संपर्क साधून चर्चेसाठी बोलावल्याचेही समजते.

Back to top button