तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनात शाळकरी मुली; सर्वेक्षणातून समोर आले वास्तव | पुढारी

तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनात शाळकरी मुली; सर्वेक्षणातून समोर आले वास्तव

सातारा : मीना शिंदे : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कॅन्सरसाठी सर्वात मोठे कारण ठरू लागले आहे. यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हेनुसार शाळकरी मुलींचा टक्का वाढू लागला असून 13 ते 15 वयोगटांतील 7.4 टक्के शालेय मुलींकडून तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होत असल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. शाळा परिसरात कोटपा कायदा फाट्यावर बसवून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थिनींभोवती कर्करोगाचे सावट घोंगावू लागल्याने पालकांनी सजगता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

जीवायटीएस सर्व्हेनुसार 13 ते 15 वयोगटातील 7.4 टक्के मुली तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर करतात. त्यामध्ये धूम्रपानासाठी 6.2 टक्के असून धूम्रपानाशिवाय तंबाखूचा वापर 3.4 टक्के आहे. धूम्रपानाशिवाय इतर तंबाखूचा वापर 3.4 टक्के एवढा आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून तंबाखू उत्पादनांवरील करांमध्ये वाढ न झाल्यामुळे महागाईच्या तुलनेत तंबाखूजन्य उत्पादने परवडणारी आहेत. तंबाखू उत्पादनांवर कर वाढवण्यासाठी महिला आणि बालकल्याण संस्थांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. तंबाखूच्या दुष्परिणामांपासून बालिकांचे संरक्षणासाठी तसा प्रस्तावही अर्थमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.

तंबाखू वापरात जगात दुसरा क्रमांक…

धुम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतात 10 लाख मृत्यू धूम्रपानामुळे होतात. 2 लाखांपेक्षा जास्त मृत्यू धूम्रपान व 3 लाख 50 हजार पेक्षा जास्त धूररहित तंबाखूच्या वापरामुळे होतात. एकूण कर्करोग रुग्णांपैकी सुमारे 27 टक्के रुग्णांना तंबाखू सेवन हे कारण समोर आले आहे. तंबाखूच्या वापरामुळे होणार्‍या रुग्णांवरील खर्च व त्यांच्या मृत्यूमुळे होणारे एकूण वार्षिक आर्थिक नुकसान 1 लाख 77 हजार 341 कोटी रुपये असून ते भारताच्या जीडीपीच्या जवळपास 1.04 टक्के एवढे आहे.

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा धोका…

ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार भारतात 15 वर्षांपेक्षा अधिक लोकसंख्येपैकी 28 टक्के लोक तंबाखू उत्पादने वापरत असून यापैकी 14 टक्के स्त्रिया आहेत. तंबाखूच्या सेवनामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तंबाखूच्या सेवन, सिगारेट व विडीच्या केवळ धुरामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढतो. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार महिलांमध्ये धूम्रपानाची सवय तसेच तंबाखूचा वापर हा कर्करोगाशी निगडीत सर्वांत प्रमुख धोकादायक घटक आहे. भारतात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा 15 ते 44 वयोगटांतील महिलांमध्ये अधिक असून मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.

महिलांनी कोणत्याही प्रकारे तंबाखूचा वापर करणे प्रजनन संस्थेसाठी हानिकारक आहे. लहान वयातील तंबाखू सेवन, धूम्रपान किंवा धूरविरहित तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन प्रौढत्वात सहजासहजी सुटत नाही. किशोरवयीन मुलींमधील तंबाखूचा वापर कमी केल्यास त्यांच्या भविष्यातील आरोग्य समस्या टाळू शकतो.
– अ‍ॅड. चैत्रा व्ही.एस.

Back to top button