सातारा : विवाहानंतर पाचव्या दिवशीच विवाहितेचा मृत्यू; वाळणे येथील घटना | पुढारी

सातारा : विवाहानंतर पाचव्या दिवशीच विवाहितेचा मृत्यू; वाळणे येथील घटना

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : वाळणे ता. महाबळेश्वर येथील नवविवाहिता आरती सतीश वाळणेकर (वय 25) हिचा उलटी, जुलाबाने मृत्यू झाल्याची घटना घडली असून, पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मयत अशी केली आहे. लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच विवाहितेचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, वाळणे या गावी सतीश वाळणेकर यांचा विवाह आरती मुसळे हिच्याबरोबर कारगाव ता. खोपोली, जि. रायगड येथे अवघ्या पाच दिवसांपूर्वी दि. 14 फेब्रुवारी रोजी झाला होता. दि. 16 ला लग्नाची पूजा झाली व दि. 19 रोजी रविवारी हळद उतरवण्याचा कार्यक्रम होता. परंतु, विवाहितेची प्रकृती बिघडल्याने तिला तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांआधीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात मृत आरतीच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी येथे चोख पोलिस बंदोबस्त होता. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे यांनी नातेवाईकांची भेट घेतली. पोनि संदिप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रऊफ इनामदार, राजू मुलाणी अधिक तपास करत आहेत.

Back to top button