भाजपला देशात हुकूमशाही राबवायचीय : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

भाजपला देशात हुकूमशाही राबवायचीय : पृथ्वीराज चव्हाण

तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा :  भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांना लोकशाही मोडून टाकायची असून देशात हुकूमशाही आणायची आहे. त्यासाठीच लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकार आणि मीडियाच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

तळबीड, ता. कराड येथे हाथसे हाथ जोडो अभियानाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील, ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश युवक उपाध्यक्ष शिवराज मोरे, धनाजी काटकर, वसंतराव जगदाळे, सिनेट सदस्य अमित जाधव,जि. प. सदस्य निवासराव थोरात, चेअरमन अनिल मोहिते, किसान सेलचे अध्यक्ष उमेश मोहिते, सरपंच मृणालिनी मोहिते, अजित पाटील, इंद्रजित चव्हाण, ऋतुराज मोरे उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, मीडियावर दडपण आणले जात आहे. राहुल गांधी यांनी मोदींना अदानींबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही देता आले नाही. त्यामुळे देशातील जनतेला भाजप सरकारचे सत्य समजावे यासाठी ‘हात से हात जोडो’ अभियान सुरू केली आहे.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, प्रस्थापितांना थांबवून राजकारणात युवकांची नवी फळी निर्माण केली पाहिजे; अन्यथा लोकशाहीविरोधी प्रतिगामी मंडळी युवकांना आपल्या जाळ्यात ओढून आपला हेतू साध्य करतील. यासाठी देशातील जनतेला सजग व सावध करण्यासाठी काँग्रेसने ‘हात से हात जोडो’ अभियान सुरू केले आहे.
भानुदास माळी म्हणाले, भाजपला देशातील लोकशाही संपवून संविधान बदलायचे आहे. देशात एकाधिकारशाही निर्माण करायची आहे. दररोज महापुरुषांवर काहीही बोलण्याचे प्रकार भाजपकडून चालू आहेत. त्यामुळे भाजपला 2024 मध्ये सत्तेतून बेदखल करूया. यावेळी शिवराज मोरे, निवास थोरात,धनाजी काटकर, अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास राजेंद्र मोहिते, अविनाश नलवडे, बाबुराव धोकटे, उपसरपंच वैशाली पाडळे, नंदकुमार मोहिते, शशिकांत मोहिते,विशाल मोहिते यासह कराड उत्तर मधील काँग्रेसचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय माने यांनी केले. आभार उमेश मोहिते यांनी मानले.

Back to top button