सातारा : सातवीतील मुलगी 4 महिन्यांची गरोदर; इन्स्टावरून जुळली मैत्री | पुढारी

सातारा : सातवीतील मुलगी 4 महिन्यांची गरोदर; इन्स्टावरून जुळली मैत्री

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर दोघांची मैत्री झाल्यानंतर सातवीतील मुलीवर 15 वर्षीय मुलाने अत्याचार केले. मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यावर चेकअप केले असता ती 4 महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. दरम्यान, मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, पीडित मुलगी सातवीत शिकत आहे. सप्टेंबर 2022 दरम्यान या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. अल्पवयीन मुलाने मुलीला गोड बोलून तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले. बाहेर फिरायला गेल्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. पुढे मुलाच्या घरात कोणी नसल्याने त्याचा गैरफायदा घेवून त्याने अत्याचार केला.

वेळोवेळी अत्याचार झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुलीला पोटदुखी होवू लागली. अखेर पालकांनी मुलीला दवाखान्यात नेल्यानंतर ती 4 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली. या घटनेने पालक कोलमडून गेले. मुलीला बोलते केल्यानंतर तिने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावरुन मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली.

तक्रारीवरुन पोलिसांनी शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेतील पिडीत मुलीवर उपचार सुरु आहेत. संशयित मुलगा व मुलगी हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इन्स्ट्राग्रामवर या दोघांची मैत्री जमली होती.

बलात्कार करतो तो अल्पवयीन कसा?

अलीकडच्या काळात अल्पवयीन गुन्हेगारीने कळस गाठला आहे. कायद्यातील तरतुदींमुळे मिसरूड फुटलेले टवाळखोर मोकाट सुटले आहेत. अल्पवयीनच्या नावाखाली नको ते धंदे त्यांना सुचत आहेत. बिनधास्त मर्डर करणे, हाफ मर्डर टाकणे, इन्स्टाग्रामचा वापर करून कोवळ्या मुलींचे आयुष्य बरबाद करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. कायद्याचेच चुकीच्या पद्धतीचे संरक्षण असल्याने ही टोळकी सोकावली आहेत. जो मर्डर करतो, जो बलात्कार करतो तो अल्पवयीन कसा? असा सवाल समाज आता कायदा बनवणार्‍या यंत्रणांना विचारू लागला आहे. समाजसुधारकांनी, कायदेतज्ञांनी, लोकप्रतिनिधींनी या विषयावर एकत्रित येऊन कायदा बदलला पाहिजे तरच ही सोकावलेली टोळकी वठणीवर येतील.

Back to top button