सातारा : आठ मशिन, पोकलॅन अन् बरंच काही… | पुढारी

सातारा : आठ मशिन, पोकलॅन अन् बरंच काही...

कराड; पुढारी वृत्तसेवा :  पुणे – बंगळूर महामार्गावरील शेंद्रे (सातारा) ते कागल (कोल्हापूर) या दरम्यानच्या मार्गाचे सहापदरीकरणाचे काम आता गतीने सुरू झाले आहे. याच कामाचा भाग असलेला कराडजवळील उड्डाण पूल पाडण्यास आठ अत्याधुनिक मशिनसह पोकलॅन, डंपर यासह अन्य साधनसामुग्रीचा वापर केला आहे. त्याचवेळी मलकापूरमधील कृष्णा हॉस्पिटलसमोर असणारा उड्डाण पूल पाडण्यास पुढील आठवड्यात प्रारंभ होणार आहे.

मागील आठवड्यात कराडचे प्रवेशद्वार असणार्‍या कोल्हापूर नाका आणि कृष्णा हॉस्पिटलसमोरील महामार्गावरील उड्डाण पूल पाडण्याची तयारी पूर्ण झाली होती. त्यानंतर रविवारपासून दोन्ही उड्डाण पूल पाडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्या मार्गावर वाहतूक वळवण्यात येणार होती, त्या मार्गावर दिशादर्शक फलक, गतीरोधक यासह अन्य उपाययोजना करण्यात आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल पाडण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी 8 अत्याधुनिक मशिन, पोकलॅन, डंपर यासह अन्य वाहनांचा उपयोग केला जात आहे. हा उड्डाण पूल पाडण्यासाठी जवळपास महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळेच कोयना पुलावरून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर कराड शहरात प्रवेश करण्यासाठी कोल्हापूर बाजूकडून येणार्‍या वाहनांना वारूंजी फाट्यावरून कराडमध्ये यावे लागत आहे. त्यामुळेच जुन्या कोयना पुलावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे.

एकीकडे अशी सर्व परिस्थिती असताना पुढील आठवड्यापासून मलकापूरमधील कृष्णा हॉस्पिटल परिसरातील उड्डाण पूल पाडण्यास प्रारंभ केला जाणार असल्याचे डीपी जैन कंपनीचे प्रदीप कुमार जैन यांनी सांगितले आहे. हे दोन्ही पूल पाडण्यासाठी जवळपास दीड महिन्याचा अवधी लागणार आहे.

13 सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार नजर…

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वारूंजी फाट्यापासून मलकापूरमधील डी मार्टपर्यंत वाहतूक पोलिसांसोबत ठेकेदार डीपी जैन कंपनीकडून 60 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 13 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कंट्रोल रूममधून वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असणारे पोलिस व अन्य कर्मचारी यांना सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे याचाही मोठा फायदा वाहन चालकांना होणार आहे.

कंट्रोल रूम आजपासून कार्यान्वित…

महामार्गावरील सेवा रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आल्याने निर्माण होणार्‍या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापूर नाक्यावर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) उभारण्यात आली आहे. या ठिकाणी ठेकेदार कंपनीचा आणि एक पोलिस कर्मचारी असे दोन लोक 24 तास तैनात असणार आहेत. ही कंट्रोल रूम शुक्रवारपासून कार्यान्वित केली जाणार असून वाहन चालकांना येणार्‍या समस्या, वाहतूक कोंडी यावर तातडीने मार्ग काढण्याची कार्यवाही या कंट्रोल रूममधून होणार आहे.

Back to top button