उचाटची नवी ओळख…‘जंगल रेशीमचे गाव’ | पुढारी

उचाटची नवी ओळख...‘जंगल रेशीमचे गाव’

सातारा;  विठ्ठल हेंद्रे :  सातारा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या कांदाटी खोर्‍यातील उचाट गावाला अनोखी ‘उंची’ प्राप्त होणार असून ते ‘जंगल रेशीमचे गाव’ म्हणून नावारूपास येणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून शेतकर्‍यांनी झाडांवर टसर अळी सोडली असून, त्यानुसार कोष तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हाताला काम मिळून त्यांना त्यांचे दाम मिळण्यास मदत होणार आहे.

रेशीम म्हटले की, महिलांच्या साड्यांसह इतर वस्त्रे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये रेशीम वस्त्राला मोठी मागणीही आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जंगलाचा मोठा भूभाग लाभलेला आहे. दुर्दैवाने मात्र या जंगल परिसरातील वाड्या-वस्ती, गावांसह परिसर मात्र दुर्लक्षितच राहिला आहे. कामासाठी ग्रामस्थांना जिल्ह्याच्या ठिकाणासह पुण्या-मुंबईची वाट धरावी लागते. सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोर्‍याची अशीच ओळख आहे. आता मात्र ही ओळख बदलणार आहे.

कांदाटी खोर्‍यातील वनपरिक्षेत्र बामणोली (वन्यजीव) येथील उचाट गावात टसर रेशीम अळी संगोपन व कोषनिर्मिती प्रयोग सुरू करण्यात आला आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी आयन नावाच्या वृक्षांवर टसर रेशीम कोषाला सुरुवात केल्यानंतर दीड महिन्यातच टसर अळीने कोष तयार करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उचाट हे गाव जंगल रेशीम गाव म्हणून उदयास येत आहे.

दर्‍याखोर्‍यात शाश्वत विकास…

  • ‘टसर (वन्य) रेशीम-शाश्वत रोजगार प्रकल्प’ अंतर्गत कांदाटी खोर्‍यात हा प्रकल्प राबवला जात आहे. आयन वृक्षाची पाने हे टसर अळीचे खाद्य आहे.
  •  टसर रेशीमला ‘वन्य रेशीम’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात टसर रेशीम उद्योग आदिवासी समुदायांसाठी रोजगाराचा प्रमुख स्रोत ठरला आहे.
  •  दर्‍याखोर्‍यांमध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून, स्थानिक शेतकर्‍यांच्या सहभागानेच टसर रेशीम कोषनिर्मिती प्रयोग केला जात आहे.

असे जाता येते उचाटला

  •  उचाट हे अत्यंत दुर्गम अशा कांदाटी खोर्‍यात आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तापोळा किंवा बामणोली येथून मार्ग आहे. वाहनातून जायचे असल्यास तापोळा येथे तराफ्यातून वाहन न्यावे लागते. उचाटला रत्नागिरी जिल्ह्यातून खेड येथून रघुवीर घाटातूनही जाता येते. खेडमार्गे एसटी ही उचाटपर्यंत पोहोचते.

टसर रेशीमसाठी उचाट गावाची निवड करण्यापूर्वी त्या परिसराचा अभ्यास करण्यात आला. टसर अळीचे खाद्य, तेथील पोषक वातावरण, ग्रामस्थांना पटवून देऊन त्यांची भूमिका विचारात घेऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली. टप्प्याटप्प्याने टसर रेशीमचे उत्पादन, त्यासाठी लागणारी बाजारपेठ याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच हा उद्योग वृद्ध, महिला, मुले अगदी दिव्यांग व्यक्तीही करू शकतात.
डॉ. योगेश फोंडे, उपजीविका तज्ज्ञ,
टसर (वन्य) रेशीम प्रकल्प

वन्य भागात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी वनविभागाच्या सहाय्याने सामाजिक संस्था काम करत आहेत. निसर्गाची कोणतीही हानी न होता उलट निसर्गाला पूरक असे टसर रेशीमसह विविध प्रकल्प राबवले जाऊ शकतात. आमच्या कांदाटी खोर्‍यात हा उपक्रम राबवताना सुरुवातीला अडचणी आल्या. आता मात्र स्थानिकांना हक्काचे काम मिळण्यास मदत होत असल्याने अत्यानंद होत आहे.
स्थानिक ग्रामस्थ

Back to top button