सातारा : उड्डाण पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद | पुढारी

सातारा : उड्डाण पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

कराड; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गावरील शेंद्रे ते कागल या दरम्यानच्या मार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामास रविवार, 5 फेब्रुवारीपासून आणखी गती मिळणार आहे. कराडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूर नाका परिसरातील उड्डाण पुलावरील सुरू असणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार असून, मशिनरीच्या सहाय्याने प्रत्यक्षात पूल पाडण्यासही सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शनिवार हा या पुलावरून अखेरची वाहतूक होणारा दिवस असणार आहे. तसेच या परिसरात वाहतुकीवर प्रचंड ताण येणार असून महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होणार आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होताना कोल्हापूर नाका परिसरात पुणे-कोल्हापूर लेनवर एकच उड्डाण पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणार्‍या वाहनांसह कराड शहरात प्रवेश करणार्‍या वाहन चालकांना मागील दोन दशके तारेवरची कसरत करावी लागत होती. या परिसरात होणारे अपघात लक्षात घेत दोन वर्षांपूर्वी सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्रित येत सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली होती. त्यानंतर सहापदरीकरणावेळी या परिसरात दोन्ही उड्डाणपूल नवीन बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे.

सद्य:स्थितीत कोल्हापूर नाका, कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी दोन मोठे उड्डाण पूल आहेत. हे दोन्ही उड्डाण पूल पाडले जाणार असून या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने एकाच पिलरवर उभा असणारा नवा पूल बांधला जाणार आहे. हा पूल कराड व मलकापूर या दोन शहरांतून जाणार असून सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा असणार आहे.

मागील आठवडाभरापासून कोल्हापूर नाका, कृष्णा नाका येथील उड्डाण पुलावरील वाहतूक बंद केल्यानंतर सेवा रस्त्यावरून वाहतूक वळवण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोल्हापूर नाका परिसरात उड्डाण पुलावरून शनिवारी अखेरचा दिवस वाहतूक सुरू असणार आहे. रविवारी या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. त्याचबरोबर पूल पाडण्यासाठी आवश्यक मशिनरी लावण्यात येऊन पूल पाडण्याच्या कामासही सुरुवात होणार आहे. उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू झाल्यानंतर सातारा बाजूकडून कोल्हापूरकडे जाणारी सर्व वाहने कराडच्या पंकज हॉटेलसमोर केलेल्या वळण मार्गातून महामार्गावरील लेनवरून जातील. पुढे कोयना खरेदी-विक्री खत कारखान्यासमोर केलेल्या वळण मार्गातून वाहने पुढे अक्षता कार्यालयासमोरून मलकापूर पुलानजीक डाव्या बाजूने सर्व्हिस रोडने पुढे जाणार आहेत. सध्या या ठिकाणी मलकापूर पुलाचे काम सुरू झालेले नाही. मात्र तेही दोन दिवसांत सुरू होणार आहे. काम सुरू झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

कोल्हापूर नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते. आता नव्या पुलाचे काम सुरू होणार असून दीड ते दोन वर्ष वाहन चालकांना, स्थानिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांसह स्थानिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
– सरोजिनी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कराड शहर वाहतूक शाखा.

Back to top button