सातारा : ना. गडकरींच्या दौर्‍याने फलटणचे राजकारण ढवळले; रामराजेंच्या उपस्थितीने राजकीय तर्क -वितर्कांना उधाण | पुढारी

सातारा : ना. गडकरींच्या दौर्‍याने फलटणचे राजकारण ढवळले; रामराजेंच्या उपस्थितीने राजकीय तर्क -वितर्कांना उधाण

फलटण; पोपट मिंड : माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या फलटण येथील कार्यक्रमास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावून खासदारांच्या मागणीनुसार कोट्यवधींच्या अनेक विकासकामांना जागेवरच मंजुरी दिली. तसेच या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थिती दर्शवली. ना. गडकरी यांच्या या दौर्‍याने फलटणचे राजकारण ढवळून निघाले असून तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

मार्केट कमिटीची निवडणूक आणि संभाव्य येऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षीय पातळीवर जोर बैठका सुरू झाल्या आहेत. आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पक्षाचे नेते करत आहेत तर निवडणुकांच्या लांबलेल्या कालावधीचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपाने केलेली विकास कामे तळागाळापर्यंत पोहोचवत आहे. नवीन विकास कामे करण्याचा जनतेला विश्वास दाखवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फलटण येथे मुंबई-पुणे या ग्रीनफिल्ड हायवे, उंडवडी पठार ते बारामती रस्ता चौपदरीकरण, भोर वरंधा घाट दुपदरीकरण, सातारा-लोणंद रस्ता कामाचे लोकार्पण ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या आग्रहातून घेण्यात आले. यावेळी ना. गडकरी यांनी नव्याने अनेक विकास कामांना मंजुरी देताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवखे खासदार असताना माढ्यामध्ये एक लाख कोटींची विकास कामे करून घेऊन मतदार संघात चमत्कार करून दाखवला असल्याचे सांगून त्यांचे कौतूक केले. त्यावेळी खासदारांचे कट्टर विरोधक आ. रामराजे ना. निंबाळकर हेही स्टेजवर उपस्थित होते.

फलटण तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गत 30 वर्षांपासून येथील बहुतेक सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रामराजे यांच्याकडेच आहेत. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादीचाच खासदार होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे इथे निवडून आले व माढ्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का दिला. मात्र, फलटणमध्ये त्यांना अपेक्षित मते मिळाली नव्हती. खासदारकी मिळाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघात विकास कामांचा झंझावात सुरू केला. राज्यातही शिंदे गट व भाजपचे सरकार असल्याने त्यांचा उत्साह अधिकच दुणावला आहे. कामाच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत. ना.गडकरी यांना फलटण येथे आणून फलटण शहरातील नऊ किलोमीटरचा रस्ता, पालखी मार्गातील अपूर्ण रिंग रोड, फलटण मधील एअर स्ट्रीपचे काम, शहरातील मिसिंग लिंक रस्ता ही शहरातील विकास कामे मंजूर करून घेतली. या विविध विकास कामाद्वारे नगरपालिकेच्या सत्तेची चावी आपल्याकडे घेण्यासाठीचे रणजितसिंहांचे प्रयत्न दिसत आहेत.

तालुक्यातील एमआयडीसी प्रकल्पाच्या अनुषंगाने अनेक विकास कामे खासदारांनी सुचवली ती सर्व रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा शब्द ना. गडकरी यांनी दिल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा होईल का याची चर्चा सुरु झाली आहे. फलटण येथील गडकरींच्या कार्यक्रमात आ.रामराजे येणार का याविषयी उत्सुकता होती. रामराजे केवळ उपस्थितच राहिले नाहीत तर गडकरींसमोर त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. व्यासपीठावर उपस्थिती लावून रामराजेंनी आपण राजकारणात किती तरबेज आहोत हे दाखवून दिले. त्यातच शहाजीबापू पाटील यांनी मी रामराजेंना घाबरतो असे म्हणून त्यांना फुल टॉसच दिला. एकेकाळी नामांकित क्रिकेटपटू असलेल्या रामराजेंनी या फुलटॉसवर सिक्सर मारुन सभेचा नूर बदलून टाकला. या कार्यक्रमात भाषण करताना समोरील मोठी गर्दी पाहून आ. रामराजे यांनी खासदारांचे कौतुक करत खिलाडू वृत्ती दाखवली.

फलटणचे राजकारण नव्या वळणावर अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षीय बदलासाठी रामराजे मानसिकता तयार करतायेत का? याही चर्चेला उधाण आले आहे. भाषणामध्ये रामराजेनी ‘भांडायच्या वेळी भांडू पण विकास कामाच्या वेळी एक राहू’ अशा केलेल्या वक्तव्याची तर अधिकच खुमासदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. तर खा. निंबाळकर यांनीही मला जे बोलायचे ते दुसर्‍या स्टेजवर बोलेन, हे वक्तव्य करून रामराजेंच्या साखर पेरणीला विरोध केला असल्याचे बोलले जात आहे. ना. गडकरी यांच्या सभेने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत प्रत्यक्ष दिसणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Back to top button