पाणी योजनांना आता इलेक्ट्रोक्लोरिनेशन यंत्रणा; राज्यभर उपक्रम : गावोगावी मिळणार स्वच्छ पाणी | पुढारी

पाणी योजनांना आता इलेक्ट्रोक्लोरिनेशन यंत्रणा; राज्यभर उपक्रम : गावोगावी मिळणार स्वच्छ पाणी

सातारा; प्रविण शिंगटे : जलजीवन मिशनअंतर्गत सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यान्वित करण्यात येणार्‍या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांसाठी इलेक्ट्रोक्लोरीनेशन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात 20 हजार 705 तर जिल्ह्यातील 875 गावातील पाणी पुरवठा योजनांना यंत्रणा बसवल्यानंतर गावांना स्वच्छ पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

बदलत्या ऋतुमानाप्रमाणे, ठिकठिकाणी पाण्याची उपलब्धतासुध्दा कमी जास्त होते. शहरी व निमशहरी भागात जेथे मोठ्या टाक्यातून नळाने पाणी पुरवठा केला जातो. धरणे, कालवे, नदी, नाले याद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध केला जातो. मात्र, पिण्यासाठी पुरवठा केले जाणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित व पिण्यायोग्य करणे व ते शेवटपर्यंत राखण्यासाठी कायम यंत्रणा सतर्क ठेवावी लागते. यामध्ये ढिलाई झाल्यास निरपराध नागरिकांसाठी जीवघेणा ठरू शकते. योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण न केल्यास, गॅस्ट्रो, कॉलरा कावीळ यासारख्या रोगांची साथ झपाट्याने पसरत असते.त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनांची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. मार्च 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याचे नियोजन शासनाचे आहे. तसेच ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता त्या गावात नळपाणी पुरवठा योजना प्राधान्याने देण्यात आली आहे. त्यामुळे टँकरमुक्त गावे करण्याचा विडा प्रशासनाने उचलला आहे. सध्या पाणी पुरवठा योंजनाची कामे गतीने सुरू आहेत. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी पाणी पुरवठा योजनांना इलेक्ट्रोक्लोरीनेशन यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे गावच्या पाणी पुरवठा योजनेनुसार त्याला खर्च येणार आहे. खर्चाची तरतूद योजनेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. ही यंत्रणा काही गावात दाखल झाली असून यंत्रे बसवण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. ही यंत्रे बसवण्यात आल्यानंतर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

इलेक्ट्रोक्लोरीनेशन यंत्रणा म्हणजे काय?

ग्रामपंचायतीच्या जलरक्षकामार्फत पूर्वी गावोगावी क्लोरीन पावडर बादलीमध्ये ढवळून टाकली जात होती. आता ती जागा इलेक्ट्रोक्लोरीनेशन यंत्रणेने घेतली आहे. या यंत्रणेमार्फत क्लोरीन गॅस पाण्यात सोडला जाणार आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी ?होवून पाणी शुध्दीकरणाचे प्रमाण आणखी वाढणार आहे. तसेच आवश्यक त्या प्रमाणातच हा गॅस सोडला जाणार असल्याने अतिरिक्त क्लोरीनचे प्रमाणही आपोआपच कमी होणार आहे. जिल्ह्यात कराड तालुक्यात 142, खंडाळा 60, माण 102, पाटण 334, फलटण 124 ठिकाणी तर वाई तालुक्यात 113 गावांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी दिली.

गावोगावच्या पाणीपुरवठा विहीरीमध्ये पाणी शुध्दीकरणासाठी टीसीएल पावडर टाकण्यात येत होती.मात्र अपेक्षित असे पाण्याचे शुध्दीकरण होत नव्हते. बर्‍याचदा पाणी शुध्द नसल्याने जलजन्य आजारंचाा सामना नागरिकांना करावा लागत होता. आता पाणी पुरवठा योजनांना इलेक्ट्रोक्लोरीनेशन यंत्रणा बसवण्यात येत आहे. त्यामुळे शुध्द पाणी पुरवठा होणार असल्याने जलजन्य आजारांना आळा बसणार आहे.
– सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. सातारा)

Back to top button