नशीब, ऑक्सिजनपण उदयनराजेंमुळेच येतोय हे अजून ऐकायला मिळालं नाही : आमदार शिवेंद्रराजे | पुढारी

नशीब, ऑक्सिजनपण उदयनराजेंमुळेच येतोय हे अजून ऐकायला मिळालं नाही : आमदार शिवेंद्रराजे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : साताराच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना नगरोत्थानमधून निधी वाढवून मिळावा. जास्त कामे व्हावीत, अशी माझी भूमिका आहे. श्रेयाचा विषयच नाही, ही कामे माझीच आहेत. मी स्वतः बैठकीला होतो, माझ्या सह्या असून कामे मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सातारकरांना माहित आहे की कामांचे श्रेय कोण घेत आहे. नशीब सातार्‍यात ऑक्सिजन पण उदयनराजेंमुळेच येतोय हे अजून ऐकायला मिळाले नाही, एवढेच आपले नशीब समजायचे, अशी उपहासात्मक टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

सुरुची या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, खा. उदयनराजे भोसले असे म्हणतात की आम्ही निधी आणला असून त्याचे श्रेय आमदार घेत आहेत. मी ज्या कामांची यादी दिली ती डीपीडीसीतून मिळालेल्या निधीची होती. मला काही श्रेय घ्यायचे नाही. मी स्वतः डीपीडीसीला हजर असतो. या कामांचे पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन विभाग यांना ही कामे प्राधान्याने घ्यावीत, त्यात अजिंक्यतारा किल्ल्याचे काम घ्यावे,यासाठी माझा आग्रह असतो. अनेक लोक त्याठिकाणी चालायला जात असतात. त्याठिकाणचे अर्धे काम झाले असून अर्धे रखडले आहे. अदालतवाडा-समर्थ मंदिरकडे जाणार्‍या रस्त्यासह इतर रस्ते हे डीपीसी आराखड्यात मंजूर केले आहेत. यासाठी वेळोवेळी भूमिका मांडली असून त्याचे रेकॉर्ड डीपीडीसीत आहे. साताराच नव्हे तर जिल्हयातील सर्व नगरपालिकांना नगरोत्थानमधून निधी वाढवून मिळावा. जास्त कामे व्हावीत अशी भूमिका आहे. श्रेय कोण घेते हे सातारकरांना माहित आहे. नशीब ऑक्सिजन पण उदयनराजेमुळेच येतोय हे सातार्‍यात अजून ऐकायला मिळाले नाही एवढेच आपले नशीब आहे. फॅशन आहे कि सातार्‍यात नाही तर जिल्हयात एखादे मोठे काम आले की ते मीच केले आणि जर कुठली कामे झाली नाहीत तर ते लोकप्रतिनिधी निष्क्रीय असून ती कामे करत नाहीत हा त्यांचा ठरलेला डॉयलॉग आहे, अशी टीकाही शिवेंद्रराजेंनी केली.

Back to top button