सातारा : रोहित पवार यांच्या फ्लेक्सवरून अजित पवार यांचा फोटो गायब | पुढारी

सातारा : रोहित पवार यांच्या फ्लेक्सवरून अजित पवार यांचा फोटो गायब

कराड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाली आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी ओगलेवाडीसह काही परिसरात फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्सवर आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह खा. श्रीनिवास पाटील यांचेही फोटो ओहत. मात्र सातारा जिल्ह्यात नेहमीच निर्णायक भूमिका बजावणार्‍या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोटो मात्र या फ्लेक्सवर नाही. त्याचबरोबर खा. सुप्रिया सुळे यांचाही फोटो नसल्याने तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जडणघडणीत नेहमीच मोलाची भूमिका राहिली आहे. त्यांचा शब्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व नेत्यांसाठी प्रमाण मानला जातो. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांकडून आ. अजित पवार यांना नेहमीच खा. शरद पवार यांच्यानंतर अग्रस्थानी ठेवले जाते असा आजवरचा इतिहास आहे.

मात्र असे असले तरी कराड शहर परिसरात लागलेल्या काही फ्लेक्समुळे मात्र तर्कविर्तक सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. नुकतीच आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आपल्या नेत्याची निवड झाल्यानंतर फ्लेक्स लावणे, ही एक आता फॅशनच झाली आहे. ओगलेवाडी परिसरात लागलेल्या फ्लेक्सवर राष्ट्रवादीचे संस्थापक खा. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे फोटो झळकले आहेत. मात्र असे असले तरी या फ्लेक्सवर विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांचाच फोटो नाही. त्याचप्रमाणे खा. सुप्रिया सुळे यांचेही छायाचित्र या फ्लेक्सवर दिसत नाही. अर्थात फ्लेक्सवर कोणाचे फोटो लावायचे आणि कोणाचे नाहीत ? हा ज्याचा – त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे फोटो झळकतात आणि त्याचवेळी पक्षाच्या नेत्यांचे फोटो फ्लेक्सवर नसतात हे थोडे आश्चर्यकारकच आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या या फ्लेक्सबाबत तालुक्यात तर्कविर्तक सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

Back to top button