बामणोली, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी आपल्या मूळ गावी दरे तांब (ता. महाबळेश्वर) येेथे मुक्कामी आले आहेत. शुक्रवारी त्यांनी आपल्या शेतात फेरफटका मारून स्ट्रॉबेरीची चव चाखली. दरम्यान, शनिवारी ते दरे गावचे आराध्य दैवत उतेश्वर देवाच्या यात्रेत सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार, दि. 6 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून शिवसागर जलाशय किनारी तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर उतरले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतातही भेट दिली. गावकर्यांसमवेत त्यांनी छोट्या वाहनातून रपेटही मारली.
आपल्या कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री शनिवारी दिवसभर विश्रांती घेवून शेत शिवारामध्ये फेरफटका मारणार आहेत. रात्री दरेगावच्या डोंगर माथ्यावर असणारे आराध्य दैवत उतेश्वर देवाच्या यात्रेत मुख्यमंत्री ना. शिंदे हे सहकुटुंब परिवारासोबत सहभागी होणार आहेत. उतेश्वराचे दर्शन घेऊन भक्तिभावाने यात्रेचा आनंद लुटणार आहेत. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ना. शिंदे हे भागातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दरे व परिसरातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ते लोकांना वेळ देणार आहेत. रविवारी दुपारनंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून पुन्हा मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.