सातारा : कडक निर्बंधात मांढरदेवी यात्रेला सुरूवात | पुढारी

सातारा : कडक निर्बंधात मांढरदेवी यात्रेला सुरूवात

पुढारी ऑनलाईन डेस्क : सातारा येथे गुरूवारी (दि. ५) मांढरदेवी यात्रेला सुरूवात झाली आहे. ५ जानेवारी ते ९ जानेवारी असे ४ दिवस ही यात्रा भरवली जाणार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मांढरदेवीकडे पाहिले जाते. आता याच मांढरदेवीची यात्रा जानेवारी २०२३ पासून सुरु झाली आहे. ५ जानेवारी ते ९ जानेवारी २०२३ असे ४ दिवस ही यात्रा भरवली जाणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल असल्याने या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक येतील हे वेगळ्याने सांगायला नको. साताऱ्यात ही यात्रा तीन दिवस चालते. या यात्रेला फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटकमधूनही भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात.

कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये किंवा भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. दुसरीकडे पुण्यातील भोर जिल्ह्यातील काळुंजे इथेही काळुबाईच्या यात्रेलाही हेच निर्बंध लागू असतील. या दोन्ही यात्रेबाबत स्थानिक प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. २००५ साली इथे चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात तब्बल २९४ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर या गडावरील यात्रा पूर्णपणे शासकीय ध्येयधोरणात पार पाडली जाते.

या दोनही यात्रेला जवळपास ८ लाख भाविक उपस्थित असतात. त्यामुळे काही निर्बंध स्थानिक प्रशासनाकडून लावण्यात आले आहेत. यात्रेच्या काळात कोणत्याही प्रकारची पशूहत्या करण्यास बंदी असेल. कोंबड्या, बकऱ्या इत्यादी प्राण्यांच्या या भागात वाहतुकीस बंदी असणार आहे. शिवाय मांढरदेवी परिसरात वाद्ये आणण्यास, परिसरातील झाडांवर खिळे ठोकणे, काळ्या बाहुल्या अडकवणे, लिंबू आणि बिब्बे ठोकणे, भानामती करणे, मंदिर परिसरात नारळ फोडणे आणि तेल वाहणे, या सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली आहे.

या ठिकाणी नारळ, तेल, लिंबू भाविक मोठ्या प्रमाणावर आणत असत. त्याचा सडा येथे पाहायला मिळत असे. याच पदार्थांच्या ओलाव्यातून निसरड्या पायऱ्यांवरुन घसरुन एक मोठी दुर्घटना घडलेली पाहायला मिळाली होती. संतप्त झालेल्या भाविकांनी पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही लक्ष्य केले होते. या घटनेनंतर दुर्लक्षित असणाऱ्या गडावर प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष गेले आणि २००६ सालापासून इथे चोख बंदोबस्त आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या गेल्या आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button