भिडेवाडा स्मारकाचे दोन महिन्यात भूमिपूजन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

भिडेवाडा स्मारकाचे दोन महिन्यात भूमिपूजन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खंडाळा /नायगाव, पुढारी वृत्तसेवा : महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करून स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. देशातील महिला शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. पुण्यातील भिडेवाडा येथे स्मारक उभारणीबाबत सर्व बाबींची पूर्तता करून दोन महिन्यांत या स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. भिडेवाड्यातील स्मारक आधुनिक भारताच्या जडण घडण प्रक्रियेतील प्रेरणास्थळ ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केले.

नायगाव (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी नायगाव येथील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. शंभूराज देसाई, ना. अतुल सावे, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. महादेव जानकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे (पाटील) राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शाम जाधव, शारदा जाधव, सरपंच साधना नेवसे, समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे, आदेश जमदाडे, निखिल झगडे, प्रदीप माने, शिक्षणधिकारी शबनम मजावर, प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, गटशिक्षण अधिकारी सुजाता जाधव, उपसरपंच वैभव कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सावित्रीबाईंना घडवण्यात नायगावचा मोठा वाटा आहे. त्यांचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. फुले दांपत्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात काम करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला स्त्री सक्षमीकरणाचा जागर जगाला आदर्शवत आहे. आज राष्ट्रपती पदावरही महिला विराजमान आहेत. सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊनच राज्य शासन काम करत आहे. इतर मागास प्रवर्गातील मुले व मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. वसतीगृहांसाठी जागा उपलब्ध करुन घेण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.

फुले दाम्पत्याच्या जीवनावरील आधारित चित्रपटासंबंधी असलेल्या अडचणी दूर करून त्यांचे कार्य सर्वांसमोर ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केला जाईल. महाज्योतीला आवश्यक तो निधी देणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्यात 2 हजार 800 बचत गटांची निर्मिती करण्यात येणार आहे. खंडाळा तालुक्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबरोबर नायगाव ते मांढरदेव रस्ताही पूर्ण केला जाईल, अशी ग्वाहीही ना. शिंदे यांनी दिली.

ना. अतुल सावे म्हणाले, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून इतर मागास विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहे. युपीएससी, एमपीएससी परीक्षाना मार्गदर्शन घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. परदेशी शिक्षण घेणार्‍यांचीही संख्या 50 करण्यात आली आहे. नागपूर येथे पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

आ. छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव काम केले पाहिजे. यापूर्वीच्या सरकारमध्ये ज्या ज्या बैठका झाल्या. त्यांना त्यांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता द्यायला हवी. शरद पवार यांनी जसे धाडसी निर्णय घेतले तसे निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतले पाहिजेत, असेही भुजबळ म्हणाले. यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन नितीन भरगुडे-पाटील यांनी केले.

कुणीही महापुरुषांचा अपमान करू नये : मुख्यमंत्री

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर मी माझी भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. महापुरुषांबाबत बोलताना सर्वांनीच तारतम्य बाळगले पाहिजे. महापुरुष हे प्रेरणा देणारे असतात. त्यांचा अपमान जनता मुळीच सहन करणार नाही. त्यामुळे कुणीही महाराष्ट्राचा अपमान करू नये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Back to top button