महाबळेश्वरमध्ये नववर्ष स्वागताचा माहोल

महाबळेश्वरमध्ये नववर्ष स्वागताचा माहोल

Published on

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : सरत्या वर्षाला निरोप व नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटन नगरी नटली असून आकर्षक विद्युत रोषणाईमुळे शहरात झगमगाट दिसत आहे. गुलाबी थंडी अन् अल्हाददायक वातावरण अशा बेधूंद वातावरणात हा जल्लोष साजरा करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांचे आगमन झाले असून नववर्षाच्या माहोलाला आता चार चाँद लागले आहेत.

महाबळेश्वर पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, रेस्टॉरंटसह मुख्य बाजारपेठेत केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक हॉटेल्सवर 31 डिसेंबर रोजी रात्री भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले असून प्रामुख्याने डीजे, लेझर शो, बालचमूंसाठी मॅजिक शो व विविध थीम्समुळे पर्यटक आकर्षित होत आहेत.

महाबळेश्वर पर्यटनस्थळी दरवर्षी विविध हंगामात देशभरातून लाखो पर्यटक भेटी देतात. सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक या पर्यटनगरीत दाखल होत आहेत. महाबळेश्वरनगरी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पर्यटनास येणार्‍या पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी परिसर सुशोभित करण्यात आला आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल, लॉजिंगमध्ये आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई केली आहे.

महाबळेश्वर व परिसरातील प्रसिद्ध ऑर्थरसीट, निसर्गरम्य केट्स पॉईंट, लॉडविक, सुर्योदयासाठीचा विल्सन, सुर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉईन्ट या प्रेक्षणीय स्थळांसह माचूतर गणपती मंदिरामागील नयनरम्य प्लेटो पॉईंट, लिंगमळा धबधबा यासारखी ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहेत. या प्रेक्षणीय स्थळांसह श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसत असून किल्ले प्रतापगड व हस्तकला केंद्र येथे देखील पर्यटकांची गर्दी होत आहे.

पर्यटक नौकाविहारासोबतच चटपटीत पदार्थांवर ताव मारताना पाहावयास मिळत आहेत. बच्चे कंपनीसाठी गेम्सची धूम असून जत्रेचाच माहोल असल्याचे वातावरण आहे. खवय्यांसाठी स्ट्रॉबेरीपासून बनवलेले विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी या व अशा पदार्थांवर ताव मारताना पर्यटक पहावयास मिळत आहेत. विविध गेम्सबरोबरच घोडेसवारीचा आनंद देखील पर्यटक लुटत आहेत. गुलाबी थंडीत वेण्णालेकवरील निसर्गसौंदर्य व सुर्यास्ताच्या वेळी दिसणार्‍या निसर्गाच्या छटा अनुभवताना पर्यटक पहावयास मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news